गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनेकदा भेटीगाठी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दोन वेळा राज ठाकरे यांना भेटले. यावरून वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू असतानाच सोमवारी रात्री पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांचं मुंबईतील निवासस्थान शिवतीर्थ येथे गेले होते. दोघांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे विविध राजकीय चर्चादेखील सुरू झाल्या आहेत. एकीकडे भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरेंच्या जागी पर्याय शोधत असल्याचं बोललं जात आहे. अनेक राजकीय विश्लेषकांना वाटतं की, राज्याच्या राजकारणात भाजपासाठी राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंची जागा भरून काढू शकतात. अशातच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या वाढलेल्या गाठीभेटींमुळे लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात बंद दाराआड काय चर्चा झाली हे कळू शकलं नसलं तरी यावर विरोधकांकडून मात्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या भेटीबाबत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर लॉजिंग बोर्डिंग केलं तरी आम्हाला काही अडचण नाही. फडणवीस तिथे गेले आणि हवं तर आठ दिवस राहिले तरी अडचण नाही. ते तिथे गेले कारण राज ठाकरे हे उत्तम होस्ट आहेत. ते लोकांचं आगत-स्वागत फार चांगलं करतात. फडणवीसांप्रमाणे इतरांनीही तिथे जावं, राहावं. शिवतीर्थावर सकाळी चालायला जावं. तिथे उत्तम खाद्यपदार्थ मिळतात, तिथे उत्तम हॉटेल्स आहेत. मुळात कोण कुणाकडे जातंय याच्यामुळे शिवसेनेचं भविष्य मार्गी लागत नाही. शिवसेना ही शिवसेनेच्या जागेवर आहे.

हे ही वाचा >> “कुस्तीपटू न्याय मागत आहेत, पण भाजपा…”, ‘स्माइल अँबेसिडर’ सचिन तेंडुलकरला राष्ट्रवादीचा खोचक सल्ला

या भेटीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या भेटीविरोधात पोस्टरबाजी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष राज राजापूरकर यांनी मुंबईत पोस्टर लावले आहेत. यावर लिहिलं आहे की, “हवालदिल शेतकरी वाऱ्यावर…, बेरोजगार युवा रस्त्यावर…, महाराष्ट्र महागाईच्या धगधगत्या निखाऱ्यावर…, आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मात्र टाईमपास गप्पा मारायला शिवतीर्थावर!”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp says devendra fadnavis meet raj thackeray for time pass chat asc
First published on: 30-05-2023 at 18:49 IST