राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी मंगळवारी रात्री राज्य सरकारच्यावतीने सर्वपक्षीय बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला. सर्वपक्षीय बैठकीवर महाविकास आघाडीने टाकलेल्या बहिष्कारानंतर सत्ताधारी विरोधकांवर टीका करत आहेत. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी महायुती सरकारला प्रत्युत्तर दिलं. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात बोलताना खासदार कोल्हे यांनी मोठा दावा केला. “दिल्लीतून देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्याचे प्रयत्न होत आहेत”, असं खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

खासदार कोल्हे काय म्हणाले?

“राज्यात अशांतता राहावी, असं विरोधकांना वाटतं आहे”, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली होती. यावर बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले, “मला असं काही वाटत नाही. माझ्याकडे या संदर्भातील काही माहिती नाही. कारण काल मी मतदारसंघात होतो. मात्र, यासंदर्भात महाविकास आघाडीची भूमिका ही स्पष्ट आहे. जनतेमध्ये संभ्रम करण्यापेक्षा यातील एक सक्षम तोडगा समोर आणणं गरजेचं आहे”, असं खासदार कोल्हे म्हणाले.

हेही वाचा : मराठा आरक्षणावरील सर्वपक्षीय बैठकीला महाविकास आघाडी अनुपस्थित का? अंबादास दानवेंनी सांगितले कारण; म्हणाले…

सर्व राजकीय पक्षांकडून मराठा आरक्षणासंदर्भात लेखी भूमिका मागितली असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रश्नावर खासदार कोल्हे म्हणाले, “मुख्यमंत्री शिंदे यांनी ज्यावेळी मुंबईत मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. त्यावेळी या संदर्भात सविस्तर चर्चा झाली होती की नाही हे माहिती नाही. मात्र, त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्यामध्ये आपण बोलायचं आणि निघून जायचं, असं ते म्हणाले होते. मग यामध्ये त्यांची काय भूमिका आहे. हे स्पष्ट होण्याची गरज आहे. तसेच यामधून सर्व घटकांना न्याय मिळेल, या पद्धतीने तोडगा निघणं गरजेचं आहे. राज्यात महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत महायुतीच्या सरकारनेही भूमिका स्पष्ट करावी. एवढ्या महिन्यांपासून हा प्रश्न भिजत ठेवला आहे. मग यामध्ये सरकारने काय भूमिका घेतली हे स्पष्ट करायला हवं”, असं अमोल कोल्हे म्हणाले.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांचे पंख भाजपा पक्षश्रेष्ठींनी कापले नसते तर लोकसभा निवडणुकीतलं महाराष्ट्रातलं चित्र वेगळं असतं का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फडणवीसांना टोला

विधानसभा निवडणुकीची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर असेल अशी चर्चा आहे. या संदर्भात अमोल कोल्हे म्हणाले, “मला असं कळलं की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नाही तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक लढवली जाणार आहे. जर अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटण्याचा प्रकार दिल्लीच्या नेत्यांकडून होत असेल तर तो महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे”, असं खासदार कोल्हे यांनी म्हटलं.