राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट केली असून त्यामध्ये मुंब्रा आणि दिवादरम्यान खाडी नष्ट केली जात असल्याचे म्हटले आहे. तसेच या ठिकाणी रोज अनेक डंपर्समधून मातीचा भराव या खाडीत टाकण्यात येत असून हा सर्व प्रकार पोलिस संरक्षणात सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबरोबरच यासंदर्भात पोलिसांना विचारणा केल्यास पोलीस ‘वरून आलंय’ असे सांगतात. ‘वरून’ हा शब्द ठाण्यात सुरू झाला असून तो शब्द कुठून येतो? हे कळत नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाडांनी एक्सवर काय म्हटलं?
“जेव्हा मुंब्रा नवीन होते, तेव्हा एका बोहरी मुस्लीम माणसाने जमीन घेतली होती. त्या जमिनीवर जाण्यासाठी त्याने स्वतः एक पूल बनवला होता. तो पूल आजही अस्तित्वात असून ‘चुहा ब्रिज’ या नावाने तो ओळखला जातो. त्या माणसाचे नाव चुहाशेठ असल्यानेच या पुलाचे नाव चुहापूल असे पडले. या पुलावरून पुढे गेल्यावर सुरूवातीला साबे आणि नंतर दिवा गाव लागते. या भागातील जमिनी तेथील गरीब शेतकरी कसत होते. या जमिनी त्या शेतकऱ्यांच्या ताब्यात होत्या. काही दिवसांपूर्वी रात्रीच्या अंधारात पोलीस आले अन् संपूर्ण जमिनीवर कब्जा घेतला. त्या दिवसांपासून हजारो डंपर्समधून माती टाकली जात असून सपाटीकरणासाठी सहा पोकलेन आणि अनेक जेसीबी काम करत आहेत”, असे जितेंद्र आव्हाडांनी म्हटले आहे.
हेही वाचा : रायगड मतदारसंघातून आठ उमेदवारांची माघार, १३ उमेदवार निवडणूक रिंगणात, तीन अनंत गीतेंचा समावेश
त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये पुढे म्हटले, “या जेसीबी, पोकलेन आणि डंपरचे संरक्षण करण्यासाठी रात्री ५० पोलीस तैनात असतात. या ठिकाणी करण्यात येत असलेली भरणी अनधिकृत आहे. मा. उच्च न्यायालयाने हा परिसर सीआरझेडमध्ये समाविष्ट असल्याचे घोषित केले आहे. शिवाय, प्लानमध्येही हा परिसर सीआरझेडचाच असल्याचे दिसत आहे. ऐन निवडणुकीत हे काम कोण करतंय, याबाबत प्रशासनातील कोणतेही अधिकारी बोलायला तयार नाहीत. पोलिसांना विचारणा केल्यास पोलीस ‘वरून आलंय’, असे सांगतात. ‘वरून’ हा शब्द ठाण्यात सुरू झालाय. तो वरून हा शब्द कुठून येतो? हेच कळत नाही. हे सर्व संशयास्पद आहे. पण त्याहीपेक्षा ते अतिशय धोकादायक आहे. कारण यामुळे सबंध मुंब्रा, दिवा पाण्यात जाणार आहे. १२ ते १५ फूट पाणी भरेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. आधीच मुंब्र्यातून जी खाडी जाते तिला बुजवून बुजवून तिचा नाला झालाय. जर हे गांभीर्यपूर्वक घेतले नाही तर या शहराच्या ऱ्हासाला आपण जबाबदार आहोत. याचे उत्तर आज ना उद्या येथील प्रशासनाला द्यावे लागेल. देव या शासन -प्रशासनाचे भले करो. पण, एवढंच लक्षात ठेवा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे महानगर पालिकेत घडतंय. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे”, असे जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवरील (ट्विटर) पोस्टमध्ये म्हटले आहे.