Rohit Pawar On Pune Station Mahatma Gandhi Statue : पुण्यातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर रविवारी रात्री सुरज शुक्ला नामक व्यक्तीने भगवे वस्त्र परिधान करून पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केल्या प्रकरणी सुरज शुक्ला याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं आहे. तसेच काँग्रेस पक्षाकडून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला दुग्धभिषेक घालण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया देत निषेध व्यक्त केला आहे. तसेच कोणी कितीही डोक आपटलं, कितीही चुकीच्या गोष्टी केल्या तरी महात्मा गांधी यांचा विचार संपणार नसल्याचं रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
रोहित पवार काय म्हणाले?
“नथुराम गोडसे हे गेले, पण त्यांच्या विचारांचे वारसदार आजही राहिलेले आहेत. अनेकवेळा महात्मा गांधी यांच्या विचारांवर अघात झाला. कितीही वेळा त्यांचा विचार तोडण्याचा आणि संपवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तरीही महात्मा गांधी यांचा विचार संपला नाही आणि संपणारही नाही. त्यामुळे गोडसे यांच्या विचारांचे जे कोणी लोक असतील त्यांनी कितीही डोक आपटलं, कितीही चुकीच्या गोष्टी केल्या तरी महात्मा गांधी यांचा विचार या भूमितून संपणार नाही”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
सुरज शुक्ला पोलिसांच्या ताब्यात
पुणे शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर रविवारी रात्री सुरज शुक्ला या व्यक्तीने भगवे वस्त्र परिधान करत पुतळ्यावर कोयत्याने वार करत पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी पोलिसांनी सुरज शुक्लाला ताब्यात घेत कारवाई केली आहे.
काँग्रेसकडून पुतळ्याला दुग्धभिषेक
महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर कोयत्याने वार करत पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याच्या घटनेनंतर पुण्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत या घटनेचा विषेध व्यक्त केला. तसेच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर दुग्धभिषेक घातला.