scorecardresearch

पत्नीला ‘मसणात जा’ म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर सदानंद सुळे संतापले; म्हणाले “मला नेहमीच वाटत होतं हे…”

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे नव्या वादाला तोंड फुटलं

Sadanand Sule on Chandrakant Patil’s statement
Sadanand Sule on Chandrakant Patil news: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे नव्या वादाला तोंड फुटलं

Sadanand Sule on Chandrakant Patil: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण मिळावं यासाठी भाजपाने बुधवारी मंत्रालयावर मोर्चा काढला होता. महाविकास आघाडी सरकार ओबीसींची फसवणूक करत असल्याचा आरोप यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला. दरम्यान यावेळी सुप्रिया सुळेंबद्दल बोलताना मात्र त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्याला सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे यांनी उत्तर दिलं आहे.

कुठून सुरू झाला वाद?

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंनी केलेल्या विधानावरून हा कलगीतुरा सुरू झाला. “ओबीसी आरक्षणासंदर्भात आपण एकत्र लढायचे असे ठरले होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले. दोन दिवसांत असं काय त्या सरकारने केले आणि दिल्लीत बैठक झाली आणि त्यांना न्याय मिळाला आणि आपल्यावर अन्याय झाला. याचं उत्तर मी केंद्र सरकारला विचारणार आहे”, असं त्या म्हणाल्या.

“तुम्ही राजकारणात कशासाठी आहात, घरी जा आणि स्वयंपाक करा”; चंद्रकांत पाटलांची सुप्रिया सुळेंवर टीका

“घरी जा आणि स्वयंपाक करा” म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मी त्याचा इतका…!”

सुप्रिया सुळेंच्या विधानावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटलांनी त्यांना स्वयंपाक करण्याचा सल्ला दिला. “तुम्ही राजकारणामध्ये कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा. तुम्ही खासदार आहात ना. एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा. शोध घ्या आणि आरक्षण द्या,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

‘‘तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. दिल्लीत जा, नाही तर मसणात जा’’, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून केले. ‘‘दिल्लीत कोणाच्या बैठका झाल्यानंतर मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षण देण्याबाबतचा निकाल लागला’’, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. तसंच दिल्लीत गेल्यावर केंद्र सरकारला याबाबत प्रश्न विचारणार असल्याचे सुळे यांनी म्हटलं होतं. याबाबत माध्यमांनी चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता, त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं. तसंच ‘‘तुम्हाला मसण माहिती आहे ना’’, अशी विचारणाही पाटील यांनी यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींना केली.

सदानंद सुळेंनी दिलं उत्तर

“हे आहेत महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि हे सुप्रिया सुळेंबद्दल बोलत आहेत. मला नेहमीच वाटत होतं हे स्त्रीद्वेषी आहेत, जिथे शक्य होईल तिथे महिलांचा अपमान करतात. मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे, ती गृहिणी आहे, ती आई आहे आणि यशस्वी राजकारणी आहे. देशातील इतर मेहनती आणि गुणवान महिलांप्रमाणे चंद्रकांत पाटलांनी सर्वच महिलांचा अपमान केलाय,” अशा शब्दांत सदानंद सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.

सुप्रिया सुळेंनीही दिलं उत्तर

“आमचं सरकार दडपशाहीचं नाही. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांना असं वाटत असेल की त्यांनी माझ्या विधानावर बोलावं, तर तो त्यांचा अधिकार आहे. त्यात गैर काय आहे?” असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला. तसेच, “त्यांना वाटलं, ते बोलले. मी त्याचा इतका काही विचार करत नाही आयुष्यात”, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी चंद्रकांत पाटलांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp supriya sule husband sadanand sule on bjp chandrakant patil statement sgy

ताज्या बातम्या