निवडणूक आयोगाच्या एका निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात शनिवारी रात्रीपासून मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. धनुष्यबाण हे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी निर्णय घेतल्यानंतर आता शिंदे गट आणि शिवसेनेकडून नव्या चिन्हांवर विचार सुरू झाला आहे. विशेष म्हणजे शिवसेना हे नावही वापरता येणार नसल्याचं सांगितलं जात असल्यामुळे उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावरून भाजपाला टोला लगावला आहे. हिंदी चित्रपटातील एका गाण्याचा उल्लेख करत भाजपा आणि एकनाथ शिंदे यांना हे गाणं चपखलपणे लागू होतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

“पक्ष आणि विचार असे संपत नाहीत”

अशा प्रकारे पक्ष आणि विचार संपत नाहीत, असं सुप्रिया सुळे प्रसारमाध्यमांना म्हणाल्या. त्या पुण्यात बोलत होत्या. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपेल असं २०१९मध्ये सगळेच म्हणत होते. अनेक लोक म्हणत होते की ‘जड से उखाड दूंगा’. असे येतात लोक, वक्तव्य करतात. पण विचार आणि कार्यकर्ते असे संपत नाहीत. तसं झालं असतं, तर देशातले सगळेच पक्ष आत्तापर्यंत संपले असते. त्यांचा जर हा अहंकार असेल, तर मग हे कधीच संपणार नाही”, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

“संहितेमध्ये मुख्य नेता असं पदच नाहीये, मग..”, शिवसेनेनं ‘या’ मुद्द्यावर ठेवलं बोट; एकनाथ शिंदेंवर टीकास्र!

भाजपा-शिंदे गटाला टोला

दरम्यान, यावेळी बोलताना सुप्रिया सुळेंनी भाजपा आणि शिंदे गटाला खोचक शब्दांत टोला लगावला आहे. “या सगळ्या प्रकरणात दोन मुद्दे आहेत. एक तर शिवसेनेवर हा अन्याय आहेच. पण मला एक जुनं गाणं आठवतं. ‘हम बेवफा, हरगिज न थे.. पर हम वफा कर ना सके. भाजपानं एकनाथ शिंदेंवर असाच वार केला आहे. चिन्ह आणि नाव कुणालाच मिळालं नाही”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

विश्लेषण : शिवसेनेचं ‘धनुष्यबाण’ चिन्ह निवडणूक आयोगानं का गोठवलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मला शिंदेगटाची काळजी वाटतेय”

“अशीच एक घटना आंध्र प्रदेशमध्ये ९५ साली घडली होती. चंद्राबाबू आणि एनटीआर यांच्यात मतभेद झाले होते. तेव्हा अशीच लढाई झाली होती. तेव्हा केंद्रात पी. व्ही. नरसिंहराव यांचं सरकार होतं. सहा महिन्यांच्या आतच त्यांनी चिन्ह चंद्राबाबू यांना दिलं होतं. सध्या राज्यातलं हे पूर्ण कारस्थान उद्धव ठाकरेंच्या विरोधात आहेच. पण मला काळजी शिंदे गटाची वाटतेय. हे गाणं जर त्यांनी ऐकलं असेल, तर भाजपाकडून ‘आम्ही बेवफा नाही, पण तुमच्याशी वफाही करू शकलो नाही’ असंच झालंय. हे गाणं आज भाजपा आणि शिंदे गटाला योग्यपणे लागू होतं”, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी भाजपा आणि शिंदे गटाला चिमटा काढला.