लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : नाटक हे संवादाचे सर्वोत्तम साधन आहे. त्यामुळे नाटकाच्या माध्यमातून माणसा-माणसातील, प्रांता-प्रांतातील, धर्मा-धर्मातील, जाती-जातीतील आणि देशा-देशातील संवाद वाढविला पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ मराठी सिनेनाट्य दिग्दर्शक, शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केली.
अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या सोलापुरातील शतक महोत्सवी अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून डॉ. पटेल बोलत होते. नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर भव्य स्वरूपात उभारलेल्या शामियानात, रंगकर्मी नामदेव वठारे रंगमंचावर ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते मोहन जोशी, अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, अभिनेत्री सविता मालपेकर, ‘सैराट’ फेम आर्ची तथा रिंकू राजगुरू, किशोर महाबोले, तेजश्री प्रधान आदींच्या उपस्थितीत संमेलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले. संमेलनाचे नियोजित उद्घाटक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री उदय सामंत आदींनी संमेलनाकडे पाठ फिरविली होती.
आणखी वाचा-सांगलीत कृष्णा कोरडी, वाहती ठेवण्यासाठी आंदोलन
डॉ. पटेल म्हणाले, सोलापूर बहुभाषिक आणि स्वाणंत्र्य चळवळीतील थोर हुतात्म्यांचे शहर आहे. नाट्य चळवळीची परंपरा असलेल्या सोलापुरातून अनेक नाट्य व चित्रपट कलावंत घडले आहेत. याच सोलापुरात होत असलेले विभागीय मराठी नाट्य संमेलन शहराची शोभा वाढविणारे आणि नाट्य संस्कृतीचा वैभव वाढविणारे ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नाटक आणि नाट्य चळवळ गावागावात, तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी विभागीय नाट्य संमेलने भरविली जात असल्याचे सांगत, प्रशांत दामले यांनी, राज्यात ठिकठिकाणी नाट्यगृहे उभारण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. जेथे नाट्यगृह नाही, तेथे नवीन नाट्यगृह उभारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तर जेथे नाट्यगृहाची दुरावस्था आहे, तेथे त्या नाट्यगृहाचे नूतनीकरण करून नाट्य चळवळीला बळ देण्याचा प्रयत्न होणार असल्याचे सांगितले.
जुळे सोलापुरात नवे नाट्यगृह
स्वागतपर भाषणात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जुळे सोलापुरात येत्या दोन वर्षात दोन नवीन नाट्यगृहांची उभारणी होणार असून त्यासाठी दहा कोटी रूपयांचा निधी उपलब्ध होत असल्याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. सोलापूरला सुमारे दीडशे वर्षांची नाट्य परंपरा लाभली असून यात मराठीसह हिंदी, उर्दू, तेलुगु, कन्नड भाषांतील नाट्य संस्कृती समृध्द झाल्याचा उल्लेखही त्यांनी केला. यावेळी माजी आमदार प्रकाश यलगुलवार, प्रा. शिवाजी सावंत आदींनी मनोगत मांडले.
आणखी वाचा-सातारा : राज्य सरकारच्या निर्णयानंतर साताऱ्यात जल्लोष
नाट्य दिंडीचा दिमाखदार सोहळा
संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी परंपरेनुसार दिमाखदार, उत्साही वातावरणात नाट्य दिंडी निघाली. स्वातंत्र्य लढ्यात १९३० सालच्या मार्शल लॉ चळवळीला जेथून सुरूवात झाली, त्या ऐतिहासिक बलिदान चौकातून नाट्य दिंडी निघाली. एका रथामध्ये मोहन जोशी, प्रशांत दामले यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत हे विराजमान झाले होते.
पारंपारिक लोककलांसह ढोल, ताशा, लेझीम, रांगोळ्यांच्या पायघड्या आणि ज्येष्ठ नाट्य कलाकारांचा सहभागातून निघालेल्या नाट्यदिंडीचे नागरिकांनी स्वागत केले. वासुदेव, पोतराज, गोंधळी, बहुरूपी, बंजारा व आराधी महिला, तसेच सिध्देश्वर यात्रेतील प्रतिकात्मक नंदीध्वज, वारकरी अशा बहुरंगी कलांनी ही नाट्य दिंडी नटली होती. दिंडीत कर्नाटकातील बाहुबली, गावरान कोंबडा, दशावतार यांचे आकर्षण होते.