“गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांच्या मोठ्या प्रमाणात हत्या होत आहेत. केंद्र सरकारने काश्मिरी पंडितांसाठी पुकारलेली घरवापसी मोहीम पूर्णपणे अपयशी झाली आहे. एकीकडे नवनीत राणा व रवी राणा यांना झेड सुरक्षा दिली जाते. हीच सुरक्षा काश्मिरी पंडितांना का देण्यात आली नाही?” असा प्रश्न विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विचारला. त्या रविवारी (५ जून) औरंगाबादमधील पत्रकार परिषदेत बोलत होत्या. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे, अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी केली.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवादी चळवळी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अनेक शासकीय कर्मचाऱ्यांच्या हत्या करण्यात येत आहेत. याची जबाबदारी केंद्र शासनाने स्वीकारावी आणि काश्मिरी पंडितांना झेड सुरक्षा देण्यात यावी. केंद्र सरकारने काश्मिरी पंडितांसाठी पुकारलेली घरवापसी मोहीम पूर्णपणे अपयशी झाली आहे. एकीकडे नवनीत राणा व रवी राणा यांना झेड सुरक्षा दिली जाते. हीच सुरक्षा काश्मिरी पंडितांना का देण्यात आली नाही?”

औरंगाबादमधील पाणी प्रश्नावर बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये औरंगाबाद जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष निधीची तरतूद जिल्ह्यासाठी केली. मोठ्या प्रमाणात औरंगाबाद जिल्ह्यात विकासाची कामे करण्यात आली. औरंगाबाद शहराचा पाणीप्रश्न कायमचा मिटवण्यासाठी पाणी पुरवठ्याची मोठी योजना आखली आहे. याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर औरंगाबाद शहराची पाणी पुरवठ्याची समस्या संपेल.”

हेही वाचा : काश्मीरमधील हत्यासत्रावर संजय राऊत संतापले; भाजपावर जोरदार टीका; म्हणाले “इतर पक्षाच्या राजवटीत झालं असतं तर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावून मनपा प्रशासनाला यावर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. औरंगाबाद शहरातील पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात विकास करण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील विविध देवस्थाने आणि पर्यटन स्थळांचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यासाठी मोठा निधी औरंगाबाद जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात येत आहे,” अशी माहिती नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.