Neelam Gorhe : अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत एक वक्तव्य संसदेत केलं. त्याचे पडसाद आज विधानपरिषदेत उमटल्याचं पाहण्यास मिळालं. केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा निषेध करण्यास सुरुवात केली. तेव्हा एका सभागृहात घडलेल्या घटनेबाबत या ठिकाणी भाष्य करता येणार नाही असं नीलम गोऱ्हे ( Neelam Gorhe ) म्हणाल्या. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.

नीलम गोऱ्हे नेमकं काय म्हणाल्या?

नीलम गोऱ्हे ( Neelam Gorhe ) म्हणाल्या, “बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानाचा मुद्दा उपस्थित करुन तुम्ही राजकारण करत आहात. त्यामुळे मी तुम्हाला मुद्दा मांडण्याची संमती देणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल आणलं. समान नागरी कायद्याचा उल्लेख पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह करत असतात. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आम्ही सभागृहात आहोत. आमचंही आयुष्य आम्ही बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यासाठी समर्पित केलं आहे. अशावेळी चुकीच्या नियमानुसार सभागृहाची तुम्ही दिशाभूल करत आहात त्यामुळे मी बोलण्याची संमती तुम्हाला मुळीच देणार नाही” असं नीलम गोऱ्हे ( Neelam Gorhe ) म्हणाल्या. काहीही झालं तरीही हा मुद्दा मी तुम्हाला मांडू देणार नाही असं गोऱ्हे ( Neelam Gorhe ) म्हणाल्या ज्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला.

अंबादास दानवे काय म्हणाले?

अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत वेगळ्या प्रकारचे शब्द वापरले. त्या शब्दांचा अर्थ काय? आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं नाही का? आम्ही याचा निषेध करत होतो मात्र सभापती नीलम गोऱ्हेंनी आम्हाला बोलू दिलं नाही. त्यांनी वेगळाच मुद्दा मांडला. त्यामुळे सभात्याग केला आहे. असं अंबादास दानवे म्हणाले. यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही भाजपावर टीका केली.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

बाबासाहेब आंबेडकर हे आमचं दैवत आहेत. आम्ही आमच्या दैवताचा अपमान सहन करणार नाही. भाजपाच्या मनात बाबासाहेब आंबेडकरांबाबत जो द्वेष आहे, संविधानाबाबत द्वेष आहे तो समोर आला आहे. इतके दिवस त्यांनी ते लपवून ठेवलं होतं, आता ही बाब समोर आली आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमित शाह यांनी काय म्हटलं होतं?

अमित शाह राज्यसभेत भाषण करताना म्हणाले, “आजकाल आंबेडकरांचे नाव सारखे सारखे घेणे ही फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर असा जप काही लोक करत असतात. एवढ्या वेळा जर देवाचे नाव घेतले तर एखाद्याला स्वर्गात जागा मिळेल.” असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं होतं. या वक्तव्याचे पडसाद विधान परिषदेत उमटले. ज्यानंतर नीलम गोऱ्हे ( Neelam Gorhe ) या संतापल्याचं पाहण्यास मिळालं.