सावंतवाडी: सार्वजनिक बांधकाम विभागाने कोकण रेल्वेच्या ११ स्थानकांवर विमानतळाचा लूक देणारी वैशिष्ट्यपूर्ण कामे केली असताना, आता वाहन पार्किंग व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी कोकण रेल्वे महामंडळाने बाहेरील कंत्राटदारांवर सोपवली आहे. विशेष म्हणजे, सावंतवाडी आणि कुडाळ येथील स्थानकांवर वाहन पार्किंगचे नवीन दर लागू करण्यात आले आहेत.

तिरुमाला तिरुपती वेंकटेश्वरा एजन्सीला कंत्राट:

कोकण रेल्वे महामंडळाने आंध्र प्रदेशातील तिरुमाला तिरुपती वेंकटेश्वरा एजन्सीला पार्किंगचे कंत्राट दिले आहे. या एजन्सीने दुचाकी, चारचाकी, ऑटोरिक्षा, जीप/एलएमव्ही आणि पर्यटक बससाठी स्वतंत्र दर निश्चित केले आहेत. तिरुमाला एजन्सीचे कंत्राटदार प्रतिनिधी बशीर शेख (कुडाळ) यांनी सावंतवाडी आणि कुडाळ येथील स्थानकांवर वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था पाहत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “रेल्वेसाठी आमचीही जमीन संपादन करण्यात आली आहे.”

स्थानिकांना डावलल्याची चर्चा:

सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकणातील ११ रेल्वे स्थानकांवर विमानतळासारखा लूक देणारी वैशिष्ट्यपूर्ण कामे केली होती. मात्र, आता वाहन पार्किंग व्यवस्थेचे नियोजन करताना कोकण रेल्वे महामंडळाने आंध्र प्रदेशातील तिरुमाला तिरुपती वेंकटेश्वरा एजन्सीला काम दिल्याने स्थानिकांमध्ये नाराजी पसरली आहे. स्थानिक हे काम करू शकले असते, पण कोकणाचा कळवळा व्यक्त करणाऱ्यांना तशा कुवतीचा कोणी मिळाला नसेल, त्यामुळे ‘कोकण तुमचा, काम आमचा’ असे एजन्सीने म्हटले तर वावगे ठरणार नाही, अशी चर्चा स्थानकावर सुरू आहे.

मुंबई रेल्वे प्रवासी संघाकडून डिआरएम (DRM) यांच्यावर कारवाईची मागणी

नवीन पार्किंग दर (सावंतवाडी रेल्वे स्थानक):

 * दुचाकी (सायकल वगळून):

   * पहिल्या ६ तासांसाठी: १० रुपये

   * ६ ते १२ तासांसाठी: १५ रुपये

   * १२ ते २४ तासांसाठी: ३० रुपये

   * २४ तासांपेक्षा जास्त आणि प्रतिदिन: मागील स्लॅबप्रमाणे लागू होणारे शुल्क अधिक अतिरिक्त शुल्क.

 * ऑटोरिक्षा:

   * पहिल्या ६ तासांसाठी: १५ रुपये

   * ६ ते १२ तासांसाठी: ३० रुपये

   * १२ ते २४ तासांसाठी: ४५ रुपये

 * जीप/एलएमव्ही (मिनी बस):

   * पहिल्या ६ तासांसाठी: ३० रुपये

   * ६ ते १२ तासांसाठी: ६० रुपये

   * १२ ते २४ तासांसाठी: १२० रुपये

 * पर्यटक बस:

   * पहिल्या ६ तासांसाठी: ५० रुपये

   * ६ ते १२ तासांसाठी: १०० रुपये

   * १२ ते २४ तासांसाठी: ३०० रुपये

 * हेल्मेटसाठी: २४ तासांसाठी २० रुपये शुल्क आकारले जाईल.

 * सायकलसाठी:

   * पहिल्या ६ तासांसाठी: ५ रुपये

   * ६ ते १२ तासांसाठी: १० रुपये

   * १२ ते २४ तासांसाठी: १५ रुपये

   * मासिक: ५० रुपये

प्रवाशांकडून नाराजी:

या नवीन दरांमुळे स्थानकावर वाहन पार्किंग करणाऱ्या प्रवाशांना आता सुधारित दराने शुल्क भरावे लागणार आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर नातेवाईकांना भेटण्यासाठी, सोडण्यासाठी किंवा आणण्यासाठी वाहन पार्किंग केले जाते. अशावेळी दुचाकी, चारचाकी, तीन आसनी किंवा कोणत्याही स्वरूपाचे वाहन पार्किंग करून जात असतानाच वाहन पार्किंग व्यवस्था सांभाळणारे कर्मचारी येतात आणि पार्किंग कर वसूल करतात. याबाबत प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दुचाकी आणि सायकल पार्किंग करणाऱ्यांना कर लागू करण्यात आला आहे, तर सेल्फी घेण्यासाठी रेल्वे स्थानकावर येणाऱ्यांना वाहन पार्किंगची व्यवस्था नाही, अशीही चर्चा आहे. केवळ कर भरणाऱ्यांनाच रेल्वे स्थानकावर वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे, असे चित्र दिसत आहे.