एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या मुलांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ‘मातोश्री’बद्दल बोलू नये असं मत व्यक्त केल्यानंतर निलेश राणे यांनी कठोर शब्दांमध्ये केसरकरांवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्वीटर हॅण्डलवरुन निलेश यांनी काही ट्वीट करत केसरकर यांना लक्ष्य केलं आहे. केसरकरांविरोधात संताप व्यक्त करणारी काही ट्वीट बुधवारी रात्री निलेश राणेंनी केली असून यामध्ये केसरकरांनी राणे कुटुंबियांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन नाराजी व्यक्त करताना आम्ही गप्प बसणार नाही, असं सांगण्यात आलंय.

नक्की वाचा >> ‘जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली त्यामागे शरद पवार होते’ म्हणणाऱ्या केसरकरांवर आव्हाड संतापले; म्हणाले, “२०१४ ला मीच…”

केसरकर काय म्हणाले?
मंगळवारी सावंतवाडी मतदारसंघाच्या शासकीय आढावा बैठकीला हजर राहिलेल्या केसरकर यांनी राणे कुटुंबियांबद्दल भाष्य करताना त्यांनी ठाकरे आणि ‘मातोश्री’बद्दल बोलू नये असं मत व्यक्त केलं. केंद्रीय मंत्री नारायण राणें यांच्याशी माझा कोणताही वैयक्तिक वाद नाही. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ‘मातोश्री’वर बोलणे टाळावे. त्यानंतर माझा कोणताही त्यांच्याशी वाद राहणार नाही. किरीट सोमय्या ‘मातोश्री’वर बोलण्याचे टाळू शकतात तर राणे यांना काय कठीण नाही, असं केसरकर म्हणाले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी विकासाच्या मुद्द्यावर एकमत करायला मी कधीही तयार आहे. मात्र नारायण राणे, त्यांचे सुपुत्र यांनी उद्धव ठाकरे,  ‘मातोश्री’वर बोलण्याचे टाळले पाहिजे. राणे यांच्याकडे रोजगार निर्माण करणारे मंत्रालय आहे त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे, असं केसरकर यांनी स्पष्टपणे सांगितलं.

नक्की पाहा >> Photos: सोमय्यांनंतर शिंदे गटाकडून नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांना थेट इशारा; म्हणाले, “उद्धव ठाकरे, ‘मातोश्री’वर…”

निलेश राणेंचं उत्तर…
केसरकरांच्या या टीकेनंतर निलेश राणेंनी ट्वीटरवरुन काही पोस्ट करत शिंदे गटाच्या प्रवक्त्यांना लक्ष्य केलं. “दीपक केसरकर २५ दिवसांपूर्वी तुम्ही किती लहान होतात हे विसरू नका,” असा टोला सायंकाळी साडेपाच वाजता केलेल्या ट्वीटमधून निलेश यांनी लागवला. त्यानंतर अन्य एका ट्वीटमध्ये निलेश यांनी, “दीपक केसरकर इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका, लायकी पेक्षा जास्त बोलू नका,” अशी टीका केली.

त्यानंतर निलेश यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत केसरकरांच्या टीकेला उत्तर दिलं. ‘दीपक केसरकर लिमिटमध्ये राहा’ अशा कॅप्शनसहीत हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. “दीपक केसरकर, आपण युतीमध्ये आहोत, हे विसरू नका. युती टिकवण्याची जबाबदारी जेवढी आमच्यावर आहे, तेवढीच जबाबदारी तुमच्यावर देखील आहे. तुम्ही शिंदेंच्या गटाचे प्रवक्ते असू शकता, आमचे नाही. तुमची लायकी आम्हाला चांगली माहीत आहे, त्यामुळे तुम्ही कशाला उड्या मारता? मतदारसंघात तुमची काय अवस्था आहे, हे आम्हाला माहीत आहे. तुम्हाला कुबड्या मिळाल्या आहेत. त्या कुबड्यांवर तरी व्यवस्थित चाला, नाहीतर मतदारसंघात तुमचा विषय आटोपला होता. तुम्हाला दुसरं राजकीय जीवनदान मिळालं आहे, हे विसरू नका. इज्जत मिळतेय तर इज्जत घ्यायला शिका, नाहीतर तुम्हाला माहिती आहे, आम्ही काही गप्प बसणार नाही,” अशा शब्दांत निलेश राणे यांनी केसरकरांना इशारा दिला.

नक्की पाहा >> Photos: ईडी, CBI चा उल्लेख करत शरद पवारांचा BJP ला टोला; शिंदे सरकारबद्दल बोलताना म्हणाले, “राज्यातील सत्ता परिवर्तन…”

यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास निलेश यांनी अन्य एक ट्वीट करत, “दीपक केसरकरांना उद्धव ठाकरे यांचा एवढा पुळका असेल तर (त्यांनी) ‘मातोश्री’वर जाऊन त्यांची भांडी घासावी,” असा खोचक टोला शिंदे गटाच्या प्रवक्त्यांना लागवला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान निलेश राणेंनी केलेल्या या टीकेला केसरकरांनी उत्तर देताना, “त्यांची लायकी काय आहे? हे सात वर्षापूर्वी कोकणातील जनतेनं त्यांना दाखवून दिली आहे. ते अजून विसरले नसतील. नाहीतर कोकणातील जनता पुन्हा एकदा त्यांना त्यांची लायकी दाखवून देईल,” असा टोला लगावला.