सोलापूर : साखर कारखान्यांचा आगामी गाळप हंगाम सुरू होण्यास चार महिन्यांचा कालावधी बाकी असताना जिल्ह्यातील ३३ पैकी नऊ साखर कारखान्यांनी मागील गळीत हंगामाची सुमारे ९३ कोटी रुपयांची किमान आधारभूत मूल्य (एफआरपी) रक्कम सोलापुरातील थकीत ठेवल्याची माहिती साखर सहसंचालक सोलापूर कार्यालयाकडून देण्यात आली.
आतापर्यंत शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करीत चोख व्यवहार करण्यासाठी प्रसिद्ध मानल्या गेलेल्या श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने २३ कोटी ५९ लाख रुपयांची ‘एफआरपी’ थकीत ठेवली आहे. याशिवाय जयहिंद शुगर (२५ कोटी ६ लाख), गोकुळ शुगर, धोत्री (१७ कोटी २२ लाख), पांडुरंग, श्रीपूर (५ कोटी ८७ लाख), सिद्धनाथ शुगर, तिऱ्हे (५ कोटी ६९ लाख), मातोश्री शुगर, दुधनी (५ कोटी ३८ लाख), इंद्रेश्वर शुगर, बार्शी (४ कोटी ६४ लाख), सहकारशिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना, वाडीकरोली, पंढरपूर (४ कोटी ५ लाख) आणि भीमा सहकारी साखर कारखाना, टाकळी सिकंदर, मोहोळ (एक कोटी ३६ लाख) याप्रमाणे साखर कारखान्यांनी ‘एफआरपी’ची थकीत रक्कम चुकविली नाही.
गेल्या १५ जून रोजी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी थकीत एफआरपीपोटी १२ कोटी ४० लाखांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली होती. मात्र तरीही यातील ९ कारखान्यांकडे आणखी ९२ कोटी ७२ लाख रुपयांची थकबाकी कायम आहे. ही माहिती सोलापूरच्या साखर सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली.
आगामी गळीत हंगाम सुरू होण्यासाठी चार महिन्यांचा अवधी राहिला आहे. परंतु नऊ साखर कारखानदारांकडे मागील हंगामातील उसाची एफआरपी पूर्णतः चुकती झाली नाही. यातील नऊपैकी आठ साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांनी ‘आरसीसी’ कायद्याखाली कारवाई हाती घेतली असली, तरी संबंधित साखर कारखान्यांकडे साखर किंवा मालमत्तेची विक्री करून शेतकऱ्यांची थकीत एफआरपीच्या रकमा अदा केल्या जात नाहीत. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ठोस कारवाई व्हावी, अशी मागणी ऊसउत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे. दरम्यान, दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याने थकीत ठेवलेली ‘एफआरपी’ची रक्कम मिळण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.