शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित असलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. नितेश राणेंचा नियमित जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर न्यायालयाबाहेरच राणे समर्थक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं चित्र पहायला मिळालं. जामीन अर्ज फेटाळल्याचा निकाल न्यायालयाने दिल्यानंतर नितेश राणे न्यायालयाबाहेर येऊन आपल्या गाडीमध्ये बसले. मात्र त्यांची गाडी पोलिसांनी अडवून ठेवल्याने त्यांचे बंधू आणि माजी खासदार निलेश राणे चांगलेच संतापले आणि गाडी का अडवली असा जाब विचारु लागले.

भाजपा आमदार नितेश राणे कोर्टातून निघत असताना पोलिसांनी न्यायलयाबाहेरच त्यांची गाडी अडवली आहे. पोलीस गाडीसमोर उभे राहिले आणि ते फोनवर वरिष्ठांशी बोलत असल्याचं सांगू लागले. मात्र बराच वेळ हा प्रकार सुरु असल्याने निलेश राणे संतापले आणि पोलिसांसोबत वाद घालू लागले. “कुठल्या अधिकाराखाली गाडी थांबवलीय सांगा,” असं म्हणत निलेश राणेंनी पोलिसांना सवाल केला. सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून १० दिवसांचं संरक्षण दिलेलं असल्याने नितेश राणेंना अटक करता येणार नाही असा दावा राणे समर्थक करत होते.

दुसरीकडे पोलिसांनी वरिष्ठांशी आम्ही चर्चा करत असून अद्याप न्यायायलयाचा निकाल आला नाही असं सांगू लागले. त्यानंतर निलेश राणेंनी निकाल खुल्या न्यायालयात लागला असून तुम्ही अशाप्रकारे एखाद्या आमदाराला थांबवू शकत नाही असं म्हणत रस्ता मोकळा करण्यास सांगितलं. मात्र तरीही पोलीस गाडी समोरुन न हटल्याने, “कशासाठी आम्ही थांबायचं ते सांगा, कोर्टाचा अपमान आम्ही करतोय की तुम्ही,” असा प्रश्न पोलिसांना विचारला.

यावर पोलिसांनी सहकार्य करा असं सांगताच निलेश राणे, “१० मिनिटांपासून उभाय मी, मी सहकार्य करतोय. कुठल्या अधिकाराखाली तुम्ही आमदाराला गाडीत बसवलंय ते सांगा,” असा प्रश्न चढ्या आवाजात विचारला.

नक्की वाचा >> अटकेपासून संरक्षण असतानाही नितेश राणेंची गाडी पोलिसांनी न्यायालयाबाहेर का अडवली?; समोर आलं कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर नितेश राणे गाडीतून उतरुन काही अंतर चालत गेले. यावेळीही त्यांच्याभोवती समर्थकांचा गराडा होता. तसेच पोलिसही त्यांच्यासोबत चालत होते. नितेश राणेंसोबत चालतानाही निलेश राणे हे, “यांची नेहमीची नाटकं आहेत,” असं म्हणत पोलिसांनी केलेल्या अडवणुकीवरुन टीका करताना दिसले.