scorecardresearch

“मुख्यमंत्र्यांना आता राजीनाम्याशिवाय पर्याय नाही”; उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावरील कारवाईनंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर असे छापे पडत असतील तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा

Nitesh Rane reaction after action against Rashmi Thackeray brother

राज्यात ईडीकडून सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर कारवाई केली जात असल्याची टीका सातत्याने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज ईडीनं मोठी कारवाई केली आहे. अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. त्यावर आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

ईडीने उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे आणि रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांच्याशी संबंधित असलेल्या पुष्पक ग्रुपवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीने ठाण्यातील निलांबरी अपार्टमेंटचे ११ फ्लॅट सील केले आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार या फ्लॅट्सची किंमत ६.४५ कोटी आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, तपास यंत्रणेने २०१७ मध्ये पुष्पक बुलियन आणि समूह कंपन्यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला होता आणि पुष्पक बुलियनची स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती.

श्री साईबाबा गृहिणी समिती प्रायव्हेट लिमिटेड या शेल कंपनीच्या माध्यमातून ३० कोटी रुपयांचे असुरक्षित कर्ज नंदकिशोर चतुर्वेदी नावाच्या एका एंट्री ऑपरेटरच्या माध्यमातून हस्तांतरित करण्यात आले. श्रीधर पाटणकर यांनी याच पैशातून ठाण्यात ही ११ घरे खरेदी केल्याचा आरोप आहे. मनी लॉन्डिरग करून हे फ्लॅट खरेदी करण्यासाठी पैसे वापरण्यात आल्याचा ईडीला संशय आहे.

“…म्हणून हा कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे”; मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावरील कारवाईनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

“हे आज ना उद्या होणारच होते. मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर असे छापे पडत असतील तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. ईडीने छापा टाकून प्रॉपर्टी जप्त केली असेल तर सरळ सरळ हा भ्रष्टाचार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. पैसे मातोश्रीपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे आता मातोश्रीने लोकांना उत्तर द्यावे. सचिन वाझेकडील पैसे कुठे फिरायचे हे आता बाहेर येत आहे. मुख्यमंत्र्यांना आता राजीनाम्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आता घरात लपून राहण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर द्यावे,” अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nitesh rane reaction after action against rashmi thackeray brother abn

ताज्या बातम्या