सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी कर्जतमधील त्यांच्या एन. डी. स्टुडिओमध्ये आत्महत्या केली. या घटनेमुळे चित्रपटसृष्टीबरोबरच सामाजिक व राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली. देसाई यांच्या आत्महत्येच्या घटनेचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही उमटले असून याप्रकरणी कर्ज देणाऱ्या कंपनीची चौकशी करण्याची मागणी काही आमदारांनी केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणात रसेश शाह यांचीही चौकशी करण्याचं आश्वासन दिल्यामुळे नितीन देसाईंना कर्ज देणाऱ्या एडलवाईस कंपनीचे संचालक रसेश शाह यांच्याही चौकशीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर त्यांच्यावर जवळपास २५० कोटींचं कर्ज असल्याची बाब समोर आली आहे. सुरुवातीला १८० कोटींचं असणारं हे कर्ज वेळेवर न फेडलं गेल्यामुळे व्याजाची रक्कम वाढून थेट २५० कोटींच्या घरात गेलं. देसाई यांच्या एनडीज् आर्ट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेडने एडलवाईज समूहातील ईसीएल फायनान्सकडून २०१६ आणि २०१८ असे दोन टप्प्यांत एकूण १८१ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ३१ मार्च २०२२ व ९ मे २०२२ अशा अनुक्रमे दोन परतफेडीच्या अंतिम तारखा होत्या. त्या पाळल्या न गेल्याने हे कर्ज बुडीत खात्यात अर्थात ‘एनपीए’ म्हणून वर्ग करण्यात आले होते.

नितीन देसाईंच्या ऑडिओ क्लिप!

दरम्यान, नितीन देसाईंच्या काही ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी कर्जाचा उल्लेख केल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, कर्ज देणाऱ्या कंपनीला स्टुडिओचा ताबा घेऊ देऊ नये, सरकारने स्टुडिओचा ताबा घ्यावा असंही नितीन देसाई यांनी ऑडिओ क्लिपमध्ये म्हटल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे कर्ज देणारी कंपनी अर्थात एडलवाईसकडून कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावण्याचे किंवा सक्तीने वसुलीसाठी प्रयत्न केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर सध्या चर्चेत आलेली रसेश शाह (Rashesh Shah) यांची एडलवाईस कंपनी आणि तिचे संचालक रसेश शाह यांचीही चर्चा सुरू झाली आहे.

‘एनडी’ स्टुडिओ बळकावण्याचा प्रयत्न? नितीन देसाई यांचा ध्वनिमुद्रित संदेश उघड…

कोण आहेत रॅशेश शाह?

नितीन देसाईंच्या आत्महत्येप्रकरणी एडलवाईस कंपनी व कंपनीचे संचालक रसेश शाह यांची चौकशी होणार असल्याचं बोललं जात आहे. रसेश शाह यांनी अहमदाबाद आयआयएममधून १९८९ साली शिक्षण पूर्ण केलं. सुरुवातीच्या काळात रसेश शाह यांनी आयसीआयसीआय वित्त कंपनीमध्ये वरच्या पदावर नोकरी केली. १९९५ साली त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन आयसीआयसीआयमधील त्यांचे सहकारी वेंकट रामास्वामी यांच्याशी भागीदारीत एडलवाईस (Edelweiss) कंपनीची स्थापना केली.

सुरुवातीच्या काळात रसेश शाह यांच्याकडे फक्त २० लाख रुपयांचं भांडवल होतं असं सांगितलं जातं. एडलवाईस कंपनीकडून क्रेडिट, विमा आणि आर्थिक सेवा पुरवल्या जातात. २० लाख रुपयांपासून रसेश शाह यांनी गेल्या २७ वर्षांमध्ये हजारो कोटींची उलाढाल असणारी कंपनी उभी केली आहे. आता ५७ वर्षांचे असणारे रसेश शाह यांनी एडलवाईसचं पहिलं कार्यालय ५०० चौरस फुटांच्या कार्यालयात त्यांचे मित्र वेंकट व इतर तीन लोकांना घेऊन सुरू केलं होतं. मुंबईच्या नरीमन पॉइंट भागात हे कार्यालय होतं. सध्या मुंबईच्या सांताक्रूझ भागात एडलवाईस हाऊस या इमारतीत त्यांचं कार्यालय आहे.

नितीन देसाईंवर तब्बल २५२ कोटी रुपयांची थकबाकी, एडलवाईस एआरसी कंपनीने उघड केले कर्जाचे तपशील…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीसांनी पावसाळी अधिवेशनात बोलताना रसेश शाह व त्यांच्या एडलवाईस कंपनीचा उल्लेख केला. “चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तीने अशा प्रकारे आपलं जीवन संपवणं दुर्दैवी आहे. त्यांनी एन. डी. स्टुडिओवर १८० कोटींचं कर्ज घेतलं होतं. ते व्याजासहीत वाढत २५२ कोटींपर्यंत पोहोचलं. यामुळे रसेश शाह व त्यांच्या एडलवाईस कंपनीकडून कर्ज देण्याची पद्धत या गोष्टी केंद्रस्थानी आल्या आहेत. या प्रकरणात रसेश शाह यांचीही चौकशी केली जाईल”, असं देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनात सांगितल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे.