scorecardresearch

तीन तासांच्या ACB चौकशीनंतर नितीन देशमुखांचा भाजपावर गंभीर आरोप; म्हणाले, “२४ मराठी लोकांवर दबाव टाकून…”

“अर्जुन खोतकर यांनी भर सभेत म्हटलं होतं, मला…”

तीन तासांच्या ACB चौकशीनंतर नितीन देशमुखांचा भाजपावर गंभीर आरोप; म्हणाले, “२४ मराठी लोकांवर दबाव टाकून…”
नितीन देशमुख ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी शिवसेना ( ठाकरे गट ) अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख हे अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ( एसीबी ) विभागीय कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. लाचलुचपत विभागाकडून नितीन देशमुख यांची तीन तास चौकशी करण्यात आली. यावेळी अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील शिवैसनिकांनी सरकार आणि बडनेराचे आमदार रवी राणांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

चौकशीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नितीन देशमुख यांनी सांगितलं की, “अर्जुन खोतकर यांनी भर सभेत म्हटलं होतं, मला ईडी नोटीस आली. माझ्या कुटुंबाचा विचार करावा लागत आहे. म्हणजे त्यांना सुद्धा धमकी देण्यात आली होती. तसेच, सुषमा अंधारेंना ईडी नाही पण रस्त्यांत तुमचा कोठेतरी घातपात करु, अशी धमकी मिळली.”

हेही वाचा : “… तो पक्षद्रोह नव्हता? मुळात त्यांचं सदस्यत्वच रद्द होतंय” अरविंद सावंतांचं शिंदे गटाला उद्देशून विधान!

“महाराष्ट्रातील २४ मराठी लोकांना दबाव टाकून भाजपात घेण्यात आलं. आज भाजपात गेल्यावर त्यांच्यावरील चौकशा का थांबल्या? त्यांच्यावर कोणतीही कारवाई का होत नाही. त्यांना पोलीस संरक्षण कसं दिलं जात आहे, हे महाराष्ट्रातील मराठी माणसाला समजायला हवं,” असं नितीन देशमुख म्हणाले.

काय आहे प्रकरण?

आमदार नितीन देशमुख यांच्याविरोधात अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार देण्यात आली. देशमुख यांच्याकडे कंपनी, कारखाने आणि अनेक शेत-जमिनी असल्याचा आरोप करत अकोल्यातील एका व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. त्यासाठी आज ( १७ जानेवारी ) नितीन देशमुखांना चौकशीला बोलण्यात आलं होतं. त्यानुसार, नितीन देशमुख चौकशीसाठी हजर झाले होते.

हेही वाचा : “चंद्रकांत खैरे हा काय पुढारी आहे का? त्यांनी जाती-जातींत भांडण लावले,” संदिपान भुमरेंचा गंभीर आरोप

देशमुखांनी कपडेही घेतले होते बरोबर

नितीन देशमुख यांनी कपडेही बरोबर घेतले होते. लाचलुचपत कार्यालयात हजर झाल्यानंतर आपल्याला अटक केली जाईल, अशी शक्‍यता गृहित धरून आपण कपडे देखील आणल्‍याचे त्‍यांनी सांगितले. “हुकूमशाहीच्या पद्धतीने सरकार चालू आहे, इंग्रजांपेक्षा हे खराब लोक आहेत. आम्ही तुरूंगात जाण्‍याची मानसिकता ठेवलेली आहे. गेल्‍या वेळी सुरतला गेलो होतो, तेव्हा माहिती नव्हती म्हणून कपडे सोबत नेले नव्हते. यावेळी कपडे घेऊन पूर्ण तयारीनिशी आलो आहे,” असं नितीन देशमुखांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-01-2023 at 16:57 IST

संबंधित बातम्या