शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. “कुणी काकाचा पक्ष चोरतो, कुणी दुसऱ्याच्या बापाचा पक्ष चोरतोय,” असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला होता. तर, “बहुमत आमच्याकडे असून हे संजय राऊतांना मोतीबिंदू झाल्यानं दिसत नसेल. त्यामुळे राऊतांच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन करू,” असं उत्तर अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी दिलं होतं. आता शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आमदार नितीश देशमुख यांनी मिटकरींना प्रत्युत्तर देत इशारा दिला आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

“एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी स्वत:चा पक्ष स्थापन करून दाखवावं. कुणी काकाचा पक्ष चोरतो, तर कुणी दुसऱ्याच्या बापाचा पक्ष चोरतोय. तेही दिल्लीतील दोन अनौरस बापाच्या ताकदीवर आणि निवडणूक आयोगासारख्या यंत्रणा ताब्यात घेऊन,” असं विधान संजय राऊतांनी केलं होतं.

“संजय राऊतांच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन करावं लागेल”

यावर अमोल मिटकरी म्हणाले, “संजय राऊतांचा मेंदू तपासण्याची वेळ आलीय. शिवसेना एकनाथ शिंदेंकडे गेली आहे. ४४ आमदारांचं बहुमत आमच्याकडे असल्यानं राष्ट्रवादी पक्षही आम्हाला मिळणार आहे. संजय राऊतांच्या डोळ्यात मोतींबिदू झाल्यानं सरळ दिसत नसेल. त्यामुळे राष्ट्रवादीला संजय राऊतांच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन करावं लागेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पाहुण्यांनी तीन वर्षे मज्जा करावी”

या विधानानंतर आमदार नितीन देशमुखांनी मिटकरींचा समाचार घेतला आहे. “अमोल मिटकरींच्या आमदारकीची तीन वर्षे राहिली आहेत. पाहुण्यांनी तीन वर्षे मज्जा करावी. नंतर हे पाहुणे कुठेच दिसणार नाहीत. मिटकरींचे गावात सरपंच, सोसायटी, जिल्हापरिषद आणि पंचायत समिती सदस्य नाहीत. त्यामुळे आम्ही ऑपरेशन करायला लागलो, तर किरीट सोमय्या होण्यास वेळ लागणार नाही,” असा इशारा देशमुखांनी मिटकरींना दिला आहे.