केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज नगरमध्ये महामार्ग प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. शरद पवारांनी देशाच्या रस्ते वाहतुकीच्या विकासामध्ये नितीन गडकरींच्या योगदानाबद्दल त्यांचं कौतुक केल्यानंतर नितीन गडकरींनी चांगल्या रस्त्यांचं महत्त्व सांगताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचं एक वाक्य सांगितलं. शिवाय, देशाच्या विकासात महत्त्वाच्या असलेल्या ४ गोष्टींपैकी रस्ते हा एक घटक असल्याचं देखील गडकरींनी यावेळी नमूद केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशाच्या विकासात ४ गोष्टी महत्त्वाच्या

“देशाच्या विकासात ४ गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पाणी, वीज, वाहतूक आणि संपर्क. देशात उद्योग आणायचे असतील, तर उद्योग सुरू व्हायच्या आधी उद्योजक या चार गोष्टी बघतो. उद्योग आला, तर भांडवली गुंतवणूक येते आणि त्यानंतर रोजगार उपलब्ध होतो. गरीबाला जात-धर्म नसतो. त्यामुळे देशातली गरिबी, बेरोजगारी दूर करायची असेल, मजूर-शेतकऱ्यांचं कल्याण करायचं असेल तर रोजगाराची निर्मिती करावी लागेल. त्यासाठी या ४ गोष्टींची व्यवस्था करावी लागेल”, असं गडकरी म्हणाले.

“…तिथले अधिकारी म्हणतात, ही गडकरींची कृपा”, नितीन गडकरींचं कौतुक करताना शरद पवारांनी सांगितला अनुभव!

केनेडींचं ‘ते’ वाक्य…

दरम्यान, यावेळी चांगल्या रस्त्यांविषयी बोलताना गडकरींनी ते महाराष्ट्रात मंत्री असतानाची एक आठवण सांगितली. ते म्हणाले, “राज्यात मंत्री असताना तेव्हा माझे सचिव असलेल्या तांबेंनी मला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचं एक प्रसिद्ध वाक्य सांगितलं होतं. ते वाक्य होतं ‘अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेतले रस्ते चांगले झालेले नाहीत. अमेरिकेतले रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत झाली.”

“राष्ट्रीय महामार्गातून सगळ्यात जास्त निधी नगर जिल्ह्याला मिळालाय असं मी ऐकलं. पण मी ज्या ज्या जिल्ह्यात जातो, तिथला खासदार हेच सांगत असतो. आणि ज्या राज्यात जातो, तिथला मुख्यमंत्री म्हणतो की सगळ्यात जास्त आम्हाला मिळालंय” असं देखील गडकरी यावेळी मिश्किलपणे म्हणाले.

दरम्यान, नागपूरमधील साखर कारखानदारीच्या अवस्थेवरून देखील नितीन गडकरींनी यावेळी केलेल्या मिश्किल टिप्पणीनंतर उपस्थितांमध्ये हास्याचे लकेर उमटली. “काल मी आमच्या केंद्रातल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की आमच्याकडे टिश्यू कल्चरचा ऊस लागतो. कारखानदारी म्हणायचं तर कोल्हापूरची साखर कारखानदारी मेरीटमधल्या विद्यार्थ्यांची शाळा वाटते, मराठवाडा म्हणजे फर्स्टक्लासमधल्या विद्यार्थ्यांची शाळा आणि विदर्भ म्हणजे ज्यांना १०० पैकी २० पेक्षा कमी गुण मिळालेत त्यांची शाळा. पण आता आम्ही ५० नर्सरी तयार केल्या आहेत. त्यातून शेतकऱ्यांना रोपं मिळायला लागली आहेत”, असं गडकरी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari speaks on good quality roads in india kenedy statement pmw
First published on: 02-10-2021 at 12:47 IST