प्रशांत देशमुख
विदर्भाचा अनुशेष भरून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न-गडकरी
यापुढे विदर्भाच्या अनुशेषावर कोणी चकार शब्द बोलणार नाही, अशी ग्वाही देतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपण व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्या-मुंबईवर अन्याय केला नाही, अशी स्पष्टोक्ती गुरुवारी येथे केली.
वर्धा यवतमाळ जिल्हय़ातील राष्ट्रीय महामार्गाच्या सात हजार कोटी रुपयाच्या विकासकामांचे भूमिपूजन व पायाभरणीचा कार्यक्रम हिंगणघाट येथील टाका पटांगणावर झाला. यावेळी झालेल्या सभेत गडकरी बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार व डॉ. रामदास आंबटकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
उर्वरित महाराष्ट्रातील लोक आता म्हणतात की, नागपूरला राहायला गेले पाहिजे, असे गंमतीने म्हणत गडकरी म्हणाले की आपण व मुख्यमंत्र्यांनी पुण्या-मुंबईतही विकासाची कामे मोठय़ा प्रमाणात केली आहेत. त्यांच्यावर अन्याय केलेला नाही. आपण १० हजार कोटी रुपयाची कामे केली. एकाही कंत्राटदाराला मी घरी बोलावून कामे दिली नाही. त्यामुळे मी छातीठोकपणे भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलू शकतो. ही कामेसुद्धा चांगल्या प्रतीची झाली आहेत. कारण पारदर्शक कारभारावर माझा व मुख्यमंत्र्यांचा भर आहे. बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यावर आगामी शंभर वर्षांत एकही खड्डा पडणार नाही. वर्धा जिल्हय़ात साडेचार हजार कोटी रुपयाची कामे सुरू आहेत. त्यामुळे या जिल्हय़ाचे चित्र पालटेल. शेतकरी आत्महत्या ही वाईट गोष्ट आहे. सिंचन वाढवणे गरजेचे आहे. आधीच्या मुख्यमंत्र्यांनीही कामे केली, पण ती सिंचनाची स्मारकेच ठरली, पण या मुख्यमंत्र्यांच्या काळात जलसंवर्धनाची चांगली कामे झाली. १०८ प्रकल्प सुरू झाले आहेत. तसेच अपुऱ्या सिंचन प्रकल्पांना २० हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. यापुढे शेतकरी आत्महत्या थांबल्याशिवाय राहणार नाहीत, अशी ग्वाहीही गडकरी यांनी दिली. याप्रसंगी त्यांनी सिंदी येथील प्रस्तावित ड्रायपोर्टच्या अध्यक्षपदी आमदार समीर कुणावार यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले. तसेच सिंदीत मेट्रो रेल्वे बोगीचा कारखाना उभारण्याची घोषणा केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विदर्भाचा अनुशेष भरून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न झाल्याचे नमूद केले. राज्यात सर्वत्र रस्ते व पुलांचे जाळे विणण्यात येत आहे. चार वर्षांत मोठे परिवर्तन झाले. हे सरकार गरिबांचे व शेतकऱ्यांचे आहे. गेल्या ७० वर्षांच्या तुलनेत या चार वर्षांत भरीव विकासकामे झाली. हिंगणघाट शहरातील नझूलच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी ही बाब
‘फ्री झोन’मध्ये टाकण्याचे जाहीर केले. आमदार कुणावार यांनी उड्डाणपूल, दिंदोडा बॅरेज, नझूल कायदा, प्रधानमंत्री आवास योजना व अन्य बाबीवर लक्ष वेधले. कुणावार यांच्या डिजीटल विकास पुस्तिकेचे विमोचन मुख्यमंत्र्यांनी केले. हंसराज अहीर व रामदास तडस यांचीही यावेळी भाषणे झाली.
‘अनुशेषावर आता कोणीही बोलणार नाही’
सत्तेवर आल्यानंतर विदर्भाच्या विकासाचे आव्हान स्वीकारून गेल्या चार वर्षांत काम केल्याचे स्पष्ट करून नितीन गडकरी म्हणाले की, जनतेने आम्हाला विकास करण्याची संधी दिली. एकेकाळी प्रचंड अनुशेष असलेल्या विदर्भाचे चित्र बदलण्याचे आव्हान आम्ही सत्तेत येताच स्वीकारले. गेल्या चार वर्षांत अनुशेष भरून काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. यापुढे विदर्भाच्या अनुशेषावर आता कोणीही बोलणार नाही.