शिवसेनेला सत्तेत जाण्याची कोणतीही घाई नाही. आगामी काळात सत्तेच्या राजकारणाबाबत निर्णय घेण्यात येईल, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या राजकारणाबाबतचा सावध पवित्रा रविवारी येथे व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयातील दाव्याचा निकाल लागेपर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र म्हणजे बेळगाव हा भाग केंद्रशासित करावा, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. तर, स्थानिक टोलप्रश्नाचा उल्लेख करून ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनेने पाहिलेले टोलमुक्त महाराष्ट्रचे स्वप्न नवे सरकार पूर्ण करेल व टोल मुक्त महाराष्ट्राची सुरुवात कोल्हापूरपासून होईल,असा विश्वास व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला यश मिळण्यासाठी ठाकरे यांनी करवीरनिवासिनी महालक्ष्मीला साकडे घातले होते. साकडे फेडण्यासाठी उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे हे उभयता रविवारी दुपारी करवीरनगरीत दाखल झाले. येथील विमानतळावर ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राज्यातील सत्ताकारणावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले,की सत्तेच्या राजकारणात काहीही होत असले तरी शिवसेनेला सत्तेत सहभागी होण्याची घाई झाली नाही. याबाबतचा निर्णय आगामी काळात घेण्यात येईल.
वादग्रस्त सीमाप्रश्नाबाबत भूमिका मांडताना ठाकरे यांनी सीमाभागातील मराठी भाषकांचा आदर करुन सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र म्हणजे बेळगाव हे केंद्रशासित करण्याची मागणी केली. बेळगाव संदर्भातील निर्णय हा विधानसभेनंतर जाहीर झाला आहे. कर्नाटकव्याप्त महाराष्ट्रातील मराठी भाषकांच्या आशा-आकांक्षा आणि भावनेचा चुराडा झाल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. पूर्वीच्या शासनाने सीमाप्रश्नी काय केले आहे, याची जाणीव सीमाभागातील मराठी बांधवांना असल्याने राज्यातील नव्या शासनाने आपली भूमिका ठामपणे मांडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
टोलप्रश्नाबाबतची भूमिका स्पष्ट करताना ठाकरे म्हणाले, की स्व. गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनेने टोल मुक्त महाराष्ट्रचे स्वप्न पाहिले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र टोलमुक्त करणार अशी घोषणा केली होती. त्यानुसार राज्यातील नव्या शासनाने निर्णयाची अंमलबजावणी कोल्हापूर टोलमुक्त करून करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
नव्या शासनाकडूनच्या अपेक्षा व्यक्त करताना ते म्हणाले,की ऊस दर, कांद्याचा दर प्रश्न, पाथर्डी दलित हत्याकांड या सर्व प्रश्नांकडे उत्तर देणारे सरकार म्हणून सर्व जनता नव्या शासनाकडे पहात आहे. त्यासाठी आम्ही नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. नव्या सरकारकडून महाराष्ट्राचं भलं व्हावं, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Nov 2014 रोजी प्रकाशित
सत्तेत जाण्याची घाई नाही – ठाकरे
शिवसेनेला सत्तेत जाण्याची कोणतीही घाई नाही. आगामी काळात सत्तेच्या राजकारणाबाबत निर्णय घेण्यात येईल, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या राजकारणाबाबतचा सावध पवित्रा रविवारी येथे व्यक्त केला.

First published on: 03-11-2014 at 04:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No rush to power uddhav thackeray