छत्रपती संभाजीनगर : सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर मराठीत लिखित स्वरूपात असे काम झालेले नाही. पंडित नेहरू आणि वल्लभभाईंमधील पत्रव्यवहार हा ग्रंथाचा मोठा दस्तऐवज आहे. त्यामुळे वल्लभभाईंचे चरित्र मराठीत आणण्याचा एक प्रकल्प राजहंस आणि न्या. नरेंद्र चपळगावकर उपाख्य नानासाहेबांनी मिळून हाती घेतला होता. मात्र, नानांचे हे कार्य त्यांच्या निधनामुळे खंडित होत अधुरे राहिले.
नानांच्या लिखाणात ठामपणा होता, पण त्यांची लेखनशैली ही बोचणारी नव्हती, असे सांगत राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर यांनी नाना ही व्यक्ती नव्हे तर संस्था, चालते-बोलते विद्यापीठच होते, अशा काही आठवणी शनिवारी येथे जागवल्या.
नांदेडच्या अभंग प्रकाशनाकडून काढण्यात आलेल्या ‘नरेंद्र चपळगावकर-व्यक्ती आणि विचार’ या ग्रंथाच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते. दिवंगत साहित्यिक, निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निवासस्थानी काही मोजक्याच सुहृदयांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. सदानंद बोरसे, नंदिनी चपळगावकर, ज्येष्ठ पत्रकार संजीव कुळकर्णी, ग्रंथाचे संपादक राधाकृष्ण मुळी, न्या. संतोष चपळगावकर, निवृत्त न्यायमूर्ती रवींद्र बोर्डे, न्या. सुनील देशमुख, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह दादा गोरे, रामचंद्र पाटील, डाॅ. अजित भागवत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
माजगावकर म्हणाले, नाना व बापू अर्थात डाॅ. सुधीर रसाळ हे दोन्ही व्यक्तिमत्त्व आपल्या आयुष्यात बऱ्याच उशिरा आले. नाना नंतर लेखक म्हणून नव्हे तर आमच्या परिवारातील एक सदस्यच बनून गेले. हैदराबाद संस्थानमधील वर्तमानपत्रांवरही एखादा ग्रंथ निर्माण व्हावा, यादृष्टीने त्यांच्याकडे मोठा दस्तऐवजही होता. नानांचा व्यासंगही मोठा होता