Mahant Ramgiri Maharaj on National Anthem: वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेले सराला बेट मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांचे एक विधान पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर येथे मिशन अयोध्या या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंगवेळी प्रवचन देताना त्यांनी भारताच्या राष्ट्रगीतावर भाष्य केले. रवींद्रनाथ टागोर लिखित जन-गण-मन हे आपले राष्ट्रगीत नसून वंदे मातरम राष्ट्रगीत व्हावे, असे ते म्हणाले. तसेच रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत का लिहिले, त्यांना नोबेल पारितोषिक कसे मिळाले? याबद्दलही त्यांनी भाष्य केले आहे. तसेच भारतात आतापर्यंत चुकीचा इतिहास शिकवला गेला. आर्य बाहेरून आलेले नसून ते आपले पूर्वज आहेत, असाही दावा त्यांनी केला.

रामगिरी महाराज नेमके काय म्हणाले?

चित्रपट गृहात प्रवचन देत असताना महंत रामगिरी महाराज म्हणाले, “१९११ साली कोलकाता येथे राष्ट्रगीताचे निर्माते रवींद्रनाथ टागोर यांनी तत्कालीन ब्रिटिश राजा जॉर्ज पंचम यांच्यासमोर ‘जन गण मन’ हे गीत गायले होते. जॉर्ज पंचम राजा भारतावर अन्याय करत होता, त्यांच्या समर्थनार्थ आणि स्तुतीसाठी हे गीत गायले गेले. हे गीत राष्ट्राला संबोधित करत नाही, त्यामुळे भविष्यात याचाही विचार करावा लागेल.” म्हणून वंदे मातरम हेच देशाचे खरे राष्ट्रगीत असले पाहीजे, असे विधान महंत रामगिरी महाराज यांनी केले. तसेच यासाठी आपल्याला संघर्षाची तयारी ठेवावी लागेल, असेही यावेळी ते म्हणाले.

हे वाचा >> Mahant Ramgiri Maharaj: महंत रामगिरी महाराज कोण आहेत? कोणत्या विधानामुळे त्यांच्यावर ५१ एफआयआर दाखल झाले?

अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला वर्षपूर्ती होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामांची महिमा सांगणारा ‘मिशन अयोध्या’ हा चित्रपट २४ जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. आर. के. योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित आणि समीर सुर्वे दिग्दर्शित ‘मिशन अयोध्या’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा महंत रामगिरी महाराज यांच्या उपस्थितीत ७ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला. यावेळी दिलेल्या प्रवचनात महंत रामगिरी यांनी राष्ट्रगीताबाबत भाष्य केले.

…म्हणून टागोर यांना नोबेल दिले

रवींद्रनाथ टागोर लिखित गीताचा विरोध करत असतानाच टागोर यांच्या कार्याचे मात्र रामगिरी महाराज यांनी कौतुक केले. ते म्हणाले, रवींद्रनाथ टागोर यांचे कार्य मोठे आहे. त्यांनी शिक्षण संस्था उभारल्या. मात्र तुम्ही पाहा आजही शिक्षण संस्था चालविणाऱ्यांना राजसत्तेशी समन्वय साधावा लागतो. त्यावेळी ब्रिटिश राजवटीत शिक्षण संस्था चालवत असताना ब्रिटिशांना धरून राहावे लागत होते. म्हणून त्यांनी ब्रिटिशांची स्तुती केली असावी. या स्तुतीमुळेच टागोर यांना नोबेल पुरस्कार मिळाला, असेही महंत रामगिरी महाराज म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साधुसंतांना चुकीच्या पद्धतीने चित्रित केले

आतापर्यंत चित्रपटांमध्ये हिंदू धर्मातील साधुसंतांना चुकीच्या पद्धतीने चित्रित केले गेले. त्याच पद्धतीने मुस्लिम धर्मगुरु किंवा ख्रिश्चन धर्मगुरु विरोधात असे दाखवले गेले नाही. मात्र आज हिंदू धर्मातील साधुसंताबद्दल चांगले दाखविण्यात येत आहे, असे म्हणत त्यांनी ‘मिशन अयोध्या’ मराठी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.