राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील बैठकीसाठी भारतात आल्यावर पाकिस्तानने काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांसोबत बैठक घेणे अनुचित ठरेल. त्यामुळे पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताझ अझिझ यांनी ही बैठक घेऊ नये, हा भारताचा सल्ला शुक्रवारी पाकिस्तानने फेटाळला. हा सल्ला स्वीकारणे पाकिस्तानसाठी शक्य नसल्याचे त्यांच्या परराष्ट्र खात्याने एका निवेदनाद्वारे सांगितले.
संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या ठरावानुसार काश्मीर हा वादग्रस्त भूभाग आहे. त्याचबरोबर पाकिस्तानमधील नेत्यांनी याआधी हुर्रियतच्या नेत्यांशी कायम चर्चा केली आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. जे आधीपासून चालत आले आहे, त्यामध्ये आता बदल करण्याची काही गरज नसल्याचेही पाकिस्तानने म्हटले आहे.
येत्या रविवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर बैठक होते आहे. यासाठी पाकिस्तानकडून सरताझ अझिझ भारतात येत आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने काश्मीरमधील फुटीरतावादी गट हुर्रियतच्या नेत्यांना नवी दिल्लीमध्ये बैठकीसाठी बोलावले आहे. यालाच भारताने स्पष्ट शब्दांत विरोध केला. हुर्रियतच्या नेत्यांसोबत बैठक घेणे पूर्णपणे अनुचित असल्याचे स्पष्ट करण्यात आले. परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबद्दल माहिती दिली.
संग्रहित लेख, दिनांक 21st Aug 2015 रोजी प्रकाशित
फुटीरतावाद्यांसोबत बैठक न घेण्याचा भारताचा सल्ला पाकने फेटाळला
हा सल्ला स्वीकारणे पाकिस्तानसाठी शक्य नसल्याचे त्यांच्या परराष्ट्र खात्याने एका निवेदनाद्वारे सांगितले.

First published on: 21-08-2015 at 06:44 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not possible to accept indias advice on meet with hurriyat leaders pak govt