सातारा: जबरी चोरी, दरोडे, मारहाण आणि गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणात पोलिसांच्या यादीवरील कुख्यात गुंड लखन भोसले हा सातारा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारांवर जरब बसणार आहे. सातारा शहरासह उंब्रज कोरेगाव, खटाव, फलटण येथे महिलांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून या गुन्हेगारासह त्याच्या टोळीने पोलिसांनाच आव्हान दिले होते. सातारा पोलिसांनी जोरदार कारवाई केल्याने नागरिकांतून याचे जोरदार स्वागत होत आहे.
लखन ऊर्फ महेश पोपट भोसले (जयराम स्वामीचे वडगाव, ता. खटाव) हा गुंड सकाळच्या वेळी गर्दी कमी असताना फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या महिलांना गाठून त्यांना धारदार शस्त्र धाक दाखवून त्यांचे दागिने हिसकावत होता. सातारा शहरात वैद्यकीय महाविद्यालयाच्या दारात व कोरेगाव येथे असेच गुन्हे दोन घडले होते. पोलिसांनी याकरता ३०० सीसीटीव्ही तपासले होते. हा आरोपी कुटुंबासह पुणे येथे राहत होता.
लखन भोसले याच्यावर सातारा, पुणे, सांगली येथे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला अटक करून त्याच्यावर मोक्का खटला भरण्यात आला होता. २०१५ मध्ये तो जामिनावर बाहेर आला. यानंतर त्याने पुन्हा जबरी चोरी, दरोडे आणि धारदार शस्त्राने हल्ला, दहशत करण्याचे उद्योग सुरू केले होते. मागील दोन महिन्यांत सातारा व सांगली जिल्ह्यात सातारा शहर, शाहूपुरी, कोरेगाव, फलटण, खटाव, उंब्रज, जत, विटा आदी भागात धारदार शस्त्राचा धाक दाखवून १५ हून अधिक जबरी चोऱ्या केल्या होत्या.
अनेक ठिकाणी त्याने दहशतही निर्माण केली होती. यामध्ये महिलांवर अत्याचार केले होते. सातारा शहरात महिलांना कोयत्याचा धाक दाखवून मंगळसूत्र हिसकावल्याच्या घटना घडल्या होत्या. फलटण येथे तर त्याने तीन जबरी चोऱ्या केल्या होत्या. या सर्व प्रकरणांमध्ये या लखन भोसले याचा समावेश होता.
शहरातील सीसीटीव्ही फुटेजवरून तसे सिद्ध झाले होते. गुन्हे करून तो सातारा जिल्ह्यातून फरारी झाला होता. तो शिक्रापूर येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर सातारा पोलिसांचे पथक त्याला पकडण्यासाठी गेले होते. या वेळी त्याने तपास पथकातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर चाकूहल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. यानंतर त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी एकदम झडप घातली असता त्याने व त्याच्या सहकाऱ्यांनी पोलीस पथकावर हल्ला केला. या वेळी पोलिसांनी बचावासाठी केलेल्या गोळीबारात लखन भोसले जखमी झाला. त्यानंतर उपचाराच्या वेळी त्याचा मृत्यू झाला. तसेच अमर केरी या त्याच्या सहकाऱ्यास ताब्यात घेतले आहे.
या आरोपीला पकडण्यासाठी पोलीस गेले असता त्याच्या नातेवाइकांनी हस्तक्षेप करत गुंडागर्दी करू नये यासाठी पोलीस पथकाने नालगांच्या घरांना बाहेरून कड्या घातल्या होत्या. पोलीस पथकाला पाहताच त्याने सुरुवातीला पळ काढला. मात्र पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण विभागातील सहायक पोलीस निरीक्षक श्यामराव काळे, पोलीस सुजित भोसले, तुषार भोसले, सागर गायकवाड, मच्छिंद्रनाथ माने या पथकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला.
मात्र लखन ऊर्फ महेश भोसले याने पोलिसांवरच हल्ला केला. यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यांच्यावर शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या ठीक आहे. या कारवाईमुळे पोलिसांचे मनोबल उंचावले असून, गुन्हेगारांना जरब बसविण्यासाठी ही कारवाई आवश्यक होती. या कारवाईचे जिल्ह्यात सर्व स्तरांतून स्वागत होत आहे
सातारा शहरात धारदार शस्त्रांचा धाक दाखवून दहशत माजवून महिलांचे दागिने लुटणाच्या घटनांमध्ये गेल्या काही माहिन्यांपासून वाढ झाली होती. याच्याशी संबंधित लखन भोसले हा मुख्य आरोपी होता. त्याच्यासह अन्य आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथक गेले होते. या वेळी त्याने या पथकावर हल्ला केल्याने स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारामध्ये लखन भोसले याचा मृत्यू झाला. या चकमकीत गंभीर जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या कर्मचाऱ्यांची प्रकृती सध्या ठीक आहे. – तुषार दोशी, पोलीस अधीक्षक, सातारा