Uddhav Thackeray On Raj Thackeray : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषा आणि मराठी विरुद्ध अमराठीच्या मुद्यांवरून चांगलाच वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. एवढंच नाही तर यावरून मनसे-ठाकरे गट आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण तापलं होतं. हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत मुंबईत एक मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली.

याच बरोबर या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी मनसेबरोबरच्या युतीचे संकेत देखील दिले होते. अद्याप शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या युतीचा कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. मात्र, या युतीबाबत राजकीय वर्तुळात सातत्याने वेगवेगळ्या चर्चा रंगताना पाहायला मिळत आहेत. यातच आता शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची ‘सामना’त मुलाखत घेतली आहे.

ही मुलाखत १९ आणि २० जुलैला प्रसिद्ध होणार आहे. मात्र, त्याआधी या मुलाखतीचा टीझर लॉन्च करण्यात आला आहे. या मुलाखतीचा टीझर संजय राऊत यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर (ट्विटर) शेअर केला आहे. या टीझरमध्ये उद्धव ठाकरे यांनी एक महत्वाचं विधान केल्याचं पाहायला मिळत आहे. ‘आता राज ठाकरेही बरोबर आले आहेत’, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याचं पाहायला मिळत आहे.

उद्धव ठाकरे यांनी टीझरमध्ये काय म्हटलं?

संजय राऊत यांनी विचारलं आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणातील ठाकरी वारे जे आहेत ते काही हटत नाहीत, ते काही थंड पडत नाहीत. त्यावर उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, “सदासर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष. हा संघर्ष एका मतलबी वाऱ्यासाठी नाही, तर समाजाच्या हितासाठी आम्ही हा संघर्ष करत आलेलो आहोत. माझ्या आजोबांपासून ते शिवसेना प्रमुख (बाळासाहेब ठाकरे) आणि त्यानंतर मी (उद्धव ठाकरे), आदित्य ठाकरे आणि आता राजही (राज ठाकरे) सोबत आलेला आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.