सोमवारी चार करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर मंगळवारी सकाळी आणखी दोन रुग्णांचे अहवाल सकारात्मक आल्याने जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची संख्या २४ वर पोहचली आहे. यातील नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जळगाव शहरापाठोपाठ अमळनेर, भुसावळ आणि पाचोरा तालुक्यातही करोनाचा शिरकाव झाल्यामुळे प्रशासनापुढील चिंता वाढली आहे.
मंगळवारी सकाळी प्राप्त झालेल्या तपासणी अहवालात सकारात्मक आढळून आलेला एक रूग्ण हा पाचोरा येथील ९२ वर्षांचा पुरूष आहे.
एक अमळनेर येथील ९० वर्षांची महिला आहे. या दोन्ही रूग्णांचा अहवाल येण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे. पाचोरा येथील रूग्णाचा दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झालेला आहे. तर अमळनेर येथील करोनाबाधित महिलेचा सोमवारी मृत्यू झाला.
जिल्ह्यात आतापर्यंत नऊ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात जळगाव शहर एक, पाचोरा एक, अमळनेर पाच आणि भुसावळ दोन अशा रुग्णांचा समावेश आहे.
जळगाव शहरातही तिसरा करोना रुग्ण
जळगाव जिल्हा रुग्णालयात करोना सदृश्य लक्षणे असल्याने दाखल झालेल्या रुग्णांपैकी नमुने घेण्यात आलेल्या ५२ रुग्णांचे तपासणी अहवाल सोमवारी रात्री जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाले. यामध्ये चौघांचे अहवाल सकारात्मक आले. यात भुसावळातील तीन तर जळगाव शहरातील जोशी पेठेतील एका रुग्णाचा समावेश आहे. या बाधित रुग्णांपैकी दोन जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यातील एका रुग्णाचा तपासणीसाठी आणण्याअगोदरच मृत्यू झाला. तर एकाचा जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मृत्यू झाला. हे दोन्ही रुग्ण भुसावळ येथील होते. अमळनेरपाठोपाठ आता भुसावळ शहरात देखील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. भुसावळात आतापर्यंत पाच करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. जळगाव शहरातही तिसरा रुग्ण आढळला. यापूर्वी शहरातील मेहरूण आणि सालारनगरात करोनाचा प्रत्येकी एक रुग्ण आढळला होता. त्यापैकी मेहरूणमधील रुग्ण उपचारानंतर बरा झाला. तर सालारनगरातील रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
