सोलापूर शहरात काल शनिवारी रात्री करोनाबाधित ४७ नवे रुग्ण सापडले होते. तसेच सातजणांचा बळी गेला होता. त्यानंतर रविवारी दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील ग्रामीण भागातही नवे १७ बाधित रुग्ण आढळून आले. शहर व जिल्ह्यात मिळून एकूण रुग्णसंख्या २०८७ झाली असून मृतांचा आकडाही १७२ वर गेला आहे. तथापि, आतापर्यंत यशस्वी उपचार होऊन ५२.७० टक्के रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

काल रविवारी रात्री शहरात बाधित ४७ नवे रूग्ण सापडले होते. तर सातजणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये तेलंगी पाच्छा पेठेत राहणाऱ्या एका ६८ वर्षांच्या माजी नगरसेविकेसह मुरारजी पेठेत एका माजी महापौराच्या ६१ वर्षांच्या मावस भावाचाही समावेश होता. त्यामुळे शहरातील रूग्णसंख्या १८९१ तर मृतांची संख्या १६१ झाली होती. जिल्हा ग्रामीण भागातील रूग्णसंख्या १९६ आणि मृतांची संख्या ११ आहे.

शहरातील बाधित रूग्णांपैकी ५४.१५ टक्के म्हणजे १०२४ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर ग्रामीण भागातील करोनामुक्त रूग्ण ७६ इतके झाले (३८.७७ टक्के) आहेत. शहर व जिल्ह्यातील मृतांचे प्रमाण ८.२४ टक्के आहे.

प्रादुर्भाव वाढला

शहरात पूर्व आणि दक्षिण भागासह आता सर्वच ठिकाणी करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. मुरारजी पेठ, उत्तर कसबा, दक्षिण कसबा या गावठाण भागातील रूग्णसंख्या शंभरचा आकडा ओलांडली आहे. रेल्वे लाईन्स, बुधवार पेठेतही रूग्ण वाढले आहेत. तर ग्रामीण भागात १९६ पैकी सर्वाधिक ९१ रूग्णसंख्या दक्षिण सोलापुरातील आहे. यात कुंभारीच्या गोदूताई परूळेकर विडी घरकुलाच्या पाठोपाठ मुळेगावच्या पारधी वस्तीवरही करोना विषाणूने थैमान घातले आहे. पारधी वस्तीवर आतापर्यंत १३ महिलांसह २५ रूग्ण आढळून आले आहेत. रविवारी सापडलेल्या नवीन १७ रूग्णांपैकी दहा रूग्ण एकटय़ा पारधी वस्तीवरील आहेत. बार्शीतही तीन नवे रूग्ण सापडले.