गडचिरोली : वादग्रस्त ट्विटप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी २१ जून रोजी पुणे व नागपूर येथून दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान, पुण्यातून एका युवकास ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून गडचिरोली पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेतला असून अटकेदरम्यान पोलिसांनी कायदा न पाळल्याचा आरोप केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी आरोप फेटाळले आहेत.

आदित्य चव्हाण व मनोज पिंपळे अशी ताब्यात घेतलेल्या संशियत आरोपींची नावे आहेत. चव्हाणला पुण्यातून तर पिंपळेला नागपूर येथून २१ रोजी पहाटे ताब्यात घेण्यात आले. आक्षेपार्ह  मजकूर पोस्ट करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या तक्रारीवरून गडचिरोली पोलीस ठाण्यात ३१ मे २०२३ रोजी दोन ट्विटर हँडलरवर गुन्हा नोंद झाला होता. दरम्यान, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात सायबर सेलने  तांत्रिक तपास केला असता आदित्य चव्हाण व मनोज पिंपळे यांनी हे ट्विटर खाते बनावट नावाने हाताळल्याचे समोर आले.

त्यानंतर  पोलीस अधीक्षक नीलोत्पल व पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनात  २१ जून रोजी पहाटे पुण्यातून आदित्य चव्हाण व नागपूर येथून मनोज पिंपळे यांना अटक करण्यात आली.  जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर पोस्ट करून गडचिरोली पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप नोंदवला आहे. त्यानुसार, चव्हाणला गडचिरोली पोलिसांनी पुण्यातील शिवाजीनगरमधून ताब्यात घेतले, पण त्यांच्याकडे अटक वॉरंट नव्हते, अंगात पोलिसांचा गणवेशही नव्हता.  चव्हाणच्या आईने हा संपूर्ण घटनाक्रम चतु:श्रृंगी ठाण्यातून सांगितल्याचाही उल्लेख पोस्टमध्ये आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपींविरोधात गडचिरोली पोलीस ठाण्यात ३१ मे रोजी गुन्हा नोंद झाला होता. त्याचा तांत्रिक तपास केल्यावर २० दिवसांनी दोन आरोपी निष्पन्न झाले. नागपूर व पुण्यातून त्यांना ताब्यात घेतले असून पथक गडचिरोलीला येत आहे. संपूर्ण कारवाई  कायदेशीर आहे.

–  नीलोत्पल, पोलीस अधीक्षक, गडचिरोली.