संगमनेर: तालुका युवक काँग्रेसच्या संकल्पनेतून आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत संगमनेर शहरात ‘समतेची मिसळ’ हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. महाराष्ट्रातील विविध जाती धर्माच्या संत, महात्मे, राष्ट्रपुरुषांनी नेहमीच समतेचा संदेश दिला आहे. सध्या सर्वत्र धर्म आणि जाती आधारित भेदभाव निर्माण केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेत संत, महात्म्यांचा समतेचा संदेश परत रुजावा, मानवता धर्म अधिक दृढ व्हावा यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी दिली.
मिसळ ही महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीची एक ओळख आहे. मात्र आज संगमनेरात शिजलेली ‘समतेची मिसळ’ अनोखी ठरली. येथील बसस्थानकासमोरील नवीन नगर रस्त्यालगत राबविण्यात आलेल्या या उपक्रमास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, उद्योजक राजेश व गिरीश मालपाणी, दुर्गाताई तांबे यांच्यासह जवळपास सर्व जाती धर्माचे प्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तयार करण्यात आलेल्या मिसळचा हजारो लोकांनी आस्वाद घेतला.
कार्यक्रमास आलेल्यांपैकी अनेकांनी येताना आपल्या सोबत मिसळ तयार करण्यासाठी लागणारा कोणता ना कोणता पदार्थ, वस्तू आणली होती. त्यामध्ये शेव, चिवडा, मटकी, पाव, मसाले, ताक, मिरची,पाणी, शेंगदाणे, कैरी, मठ्ठा , कांदे, टोमॅटो, कोथिंबीर अशा विविध वस्तूंचा समावेश होता. विविध जाती धर्माच्या लोकांनी आणलेले हे पदार्थ एकत्रित करून त्यातून ‘समतेची मिसळ’ तयार करण्यात आली. आलेल्या प्रत्येकाने या मिसळचा आनंदाने आस्वाद घेतला.
याप्रसंगी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, युवक काँग्रेसच्या पुढाकारातून विविध समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवला आहे. यामध्ये भेद नाही तर एकता आहे. भारतामध्ये असलेल्या सामाजिक विविधतेमध्ये देखील एकता, मानवता आहे. मानवतेचा धर्म अधिक मजबूत होण्यासाठी ही एकत्रित मिसळ आहे.
वारकरी धर्मामध्ये जसा काला पवित्र प्रसाद म्हणून घेतला जातो, तसा हा एकतेचा संदेश देणारा प्रसाद आहे. यात सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाले असून त्यांनी आणलेल्या विविध वस्तूंपासून ही मिसळ तयार केली म्हणून ही समतेची मिसळ आहे. समतेचा विचार सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वरांपासून, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विविध संत व समाज सुधारक यांनी समतेचा विचार महाराष्ट्र आणि देशाला दिला आहे.
कार्यक्रमाच्या आयोजक डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, महाराष्ट्राला विविध संत, समाजसुधारकांच्या विचारांची व संस्काराची परंपरा आहे. सध्या जातीच्या नावावर होणारे राजकारण अत्यंत चुकीचे असून मानवतेचा धर्म हा सर्वात मोठा धर्म आहे. तो जपण्यासाठी समतेची मिसळ हा उपक्रम सर्वांनी मिळून आयोजित केला आहे. यामध्ये शहर, तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी पुढाकार घेऊन दिलेल्या विविध वस्तू एकत्र करून समतेची मिसळ बनवली आहे. या मिसळ प्रमाणेच समाजातील सर्वांनी गुण्यागोविंदाने एकत्रितपणे राहण्याची अपेक्षा असल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी डॉ. तांबे यांचेही भाषण झाले.