छत्रपती संभाजीनगर / सोलापूर : पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात बुधवारी वळवाच्या पावसाने हजेरी लावली. जालना जिल्ह्यात वीज पडून २५ वर्षांच्या युवकाचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.
लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनावरे दगावली आहेत. वळवाच्या पावसामुळे चार हजार २१६ हेक्टर पिकांवर शेतीचे नुकसान झाले आहे. विशेषत: टोमॅटोसह भाजीपाल्याचे नुकसान मोठे आहे. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात सालगाव येथे वीज पडून सनील विलास गाढवे (वय २५) या तरुणाचा मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यात नेलवाड, एरंडी, टाकळी येथे वीज पडून तीन जनावरे दगावली. धाराशिव शहरातील अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचले होते.
छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे आंबा, मोसंबी, डाळिंब व पिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. परभणी जिल्ह्यात १९२५ हेक्टरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे.
सर्वाधिक नोंद सावंतवाडीत
गेल्या २४ तासांत म्हणजेच मंगळवारी सकाळी ८:३० ते बुधवार सकाळी ८:३० पर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे झाली. तेथे १३० मिमी पावसाची नोंद झाली. तर, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत सायंकाळनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. सावंतवाडीबरोबरच मालवण येथे ११४ मिमी, रामेश्वर ११८.८ मिमी, रोहा ७८ मिमी, देवरुख ९५ मिमी आणि चिंचवड येथे १०१ मिमी पावसाची नोंद झाली.