अलिबाग : कर्जत मध्ये दहिवली परिसरात पिसाळलेल्या बैलाने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. तर अन्य पाच जण जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. कर्जत शहरातील दहिवाली परिसर आणि श्रीराम पुल परिसरात गेली दोन दिवस हा बैल फिरत होता. त्याने बुधवारी रात्री पासून धुडगूस घालण्यास सुरुवात केली. येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरुंवर हल्ले करण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाहनांचेही नुकसान केले. त्यामुळे या परिसरातील नागरिकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

पिसाळलेल्या बैलाने आधी आदित्य कनोजिया वय ९ वर्षी मुलावर बुधवारी रात्री हल्ला केला होता. यानंतर गुरुवारी सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या मंजुळा चव्हाण ६५, योगिता थोरवे ४४ या दोघींवर हल्ला केला. यात मंजुळा चव्हाण गंभीर जखमी झाल्या, त्यामुळे त्यांना उपचारासाठी पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर योगिता थोरवे यांना कर्जत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

संभाजी नगर येथे राहणारे सत्तर वर्षीय अर्जुन म्हसे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. पिसाळलेल्या बैलाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात म्हसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अन्य काही वाटसरुंवरही या बैलाने हल्ला चढवला. त्यात ते किरकोळ जखमी झाले. दरम्यान या घटनांची दखल घेऊन, पिसाळलेल्या बैलाला पकडण्यासाठी कर्जत पोलीस आणि नगर पालिका प्रशासनाने बैलाला पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली. यावेळी या परिसरातील वाहतुक बंद ठेवण्यात आली होती.

खोपोलीतील हेल्प फाऊंडेशनला या मोहिमेसाठी पाचारण करण्यात आले. आक्रमक झालेल्या बैलाला आवर घालणे अतिशय कठीण झाल होते. यावेळी बैलाकडून बचाव पथकांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर बैलाला पकडण्यात यश आले. गुरुनाथ साठेलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बैलाला पकडून नगर पालिका प्रशासनाच्या ताब्यात दिले.