दगडखाणीतील बेकायदा उत्खननप्रकरणी कारवाई टाळण्यासाठी पाच लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडला गेलेला कर्जतचा तलाठी युवराज बांगर याला आज न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला.
लाच घेताना पकडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बांगर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून, त्याला अटक केली होती. त्याला न्यायालयाने १ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याची मुदत आज संपल्याने आज पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तेव्हा सरकार पक्षातर्फे सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. मात्र ही मागणी न्यायालयाने मान्य केली नाही. यापूर्वी दिलेली कोठडी पुरेशी असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले.
बांगर याची एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर मुक्तता करण्यात आली. मात्र जामिनावर सोडताना न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. पुढील आदेश होईपर्यंत बांगर याने कर्जत तालुक्यात प्रवेश करावयाचा नाही, पुढील महिनाभर अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजेरी लावायची, महसूल अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याशी संपर्क साधायचा नाही किंवा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणायचा नाही, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.