लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये उच्चांकी स्वरूपात होणारी कांद्याची आवक सुरूच असून यातच ताण वाढल्याची सबब पुढे करून एक दिवसाआड लिलाव बंद ठेवल्याच्या पध्दतीमुळे कांद्याची दर घसरण न थांबता खालावतच आहे. मागील महिनाभरात कांद्याचा प्रतिक्विंटल दर दीड ते दोन हजार रूपयांच्या खाली आला आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत असताना व्यापाऱ्यांसाठी मात्र सुगीचे दिवस आले आहेत.

गेल्या नोव्हेंबरपासून कृषी बाजारात कांदा दाखल होत आहे. केंद्र सरकारने केलेली कांदा निर्यातबंदी, अतिवृष्टी, ढगाळ वातावरण, त्यातच सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीचे शून्य नियोजन यामुळे कांदा दर घसरणीची मालिका सुरूच आहे.

गेल्या महिन्यात कांदा लिलावाचे तीनतेरा वाजले होते. लिलाव ज्या त्या दिवशी न होता कोणतीही सबब पुढे करून लिलाव रोखला जात आहे. यातच शेतकऱ्यांच्या दयनीय स्थितीचा पुरेपूर फायदा घेऊन माथाडी कामगार अचानकपणे मजुरी वाढवून मिळण्यासाठी कांदा उतरून घेण्याच्या कामावर बहिष्कार घालतात. यात शेवटी शेतकऱ्यांना वेठीस धरला जातो. ही लूट सुरू असताना कांदा दरात सुधारणा न होता शेतकऱ्यांना दिवसेंदिवस निराशाच पत्करावी लागत आहे.

आणखी वाचा-मोठी बातमी! सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती, जामीनही मंजूर

गेल्या महिन्यात कांद्याचा दर खालावून प्रतिक्विंटल सर्वसाधारण अडीच हजार रूपयांपर्यंत गेला होता. त्यात केवळ वाढीव दराचा देखावा म्हणून हातावर मोजण्याइतक्या म्हणजे जेमतेम चार-पाच क्विंटल कांद्याला चार हजार ते पाच हजार रूपयांचा दर दिला जात होता. सर्वसाधारण दर निराशाजनकच असून त्यातही मागील महिनाभरात दीड हजार ते दोन हजारांनी घसरण होत आहे. गेल्या ६ जानेवारी रोजी ९२ हजार ३६९ क्विंटल कांदा दाखल झाला असता दर १२०० रूपये १७०० रूपयांपर्यंत मिळाला होता. त्यानंतर काल सोमवारी दाखल झालेल्या ९६ हजार ६७३ क्विंटल कांद्याला प्रतिक्विंटल १२०० ते १४०० रूपये दर मिळू शकला. तर बुधवारी कांदा आवक एक लाख क्विंटलपेक्षा जास्त झाली असता दर घरसण आणखी सुरूच राहून जेमतेम एक हजार ते १३०० रूपयांपर्यंतच दर देऊन शेतक-यांची बोळवण करण्यात आली. यात खरेदीदार व्यापाऱ्यांना मात्र सुगीचे दिवस आले आहे. शेतकऱ्यांकडून अत्यल्प दरात खरेदी केलेला कांदा हैदराबाद, चेन्नई, ओडिसा, केरळ आदी दूरच्या भागात पाठविला जात असून त्यातून व्यापारी मालोमाल होत आहेत.

सोलापूर कृषिउत्पन्न समितीचा कांदा लिलावावर अंकुश दिसून येत नाही. माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे कांदा लिलाव एक दिवसाआड होत असल्यामुळे शेतकऱ्यांना कोणताही दिलासा न मिळता उलट आर्थिक फटकाच सहन करावा लागत आहे. यासंदर्भात कृषिउत्पन्न बाजार समितीचे सचिव दत्तात्रय सूर्यवंशी यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. उद्या गुरूवारी कांदा लिलाव बंद राहणार असून त्यानंतर पुन्हा सलग तीन दिवस लिलाव होणार नसल्याचे जाहीर करण्यात आले.

आणखी वाचा-यवतमाळचा ‘बोधिसत्व’ वसुंधरा फिल्म फेस्टि‌व्हलमध्ये; नॅशनल जिओग्राफिक’द्वारे लघुपटाची निर्मिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकऱ्यांना धतुरा अन् ?

केंद्र सरकारची कांदा निर्यातबंदीतून सुलतानी संकट आणि दुसरीकडे अवकाळी पावसामुळे आस्मानी संकट अशा दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांची आणखी किती लूट होणार हे माहीत नाही. कृषिउत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांसाठी आहे की व्यापाऱ्यांसाठी ? शेतकऱ्यांच्या हाती धतुरा आणि व्यापारी व प्रशासनाच्या हाती मलिदा अशी दयनीय अवस्था आहे. -अनिल गोरोबा कुंभार, कांदा उत्पादक शेतकरी, झरेगाव, ता. बार्शी