सोलापूर : धुळे येथील शासकीय विश्रामगृहाच्या कक्षात दीड ते दोन कोटींची रोकड सापडल्याच्या आरोपाची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केली.
दानवे म्हणाले, की अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखालील आमदारांची समिती धुळ्यात विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी व इतर कामकाजाची पाहणी तथा अभ्यास करण्यासाठी आली होती. या समितीच्या सदस्यांना राहण्यासाठी शासकीय विश्रामगृहात कक्ष उपलब्ध करून देण्यात आले होते. परंतु एका कक्षात मोठी रोकड सापडल्याचा आरोप गोटे यांनी केला आणि त्यांच्याच तक्रारीनुसार शासकीय अधिकाऱ्यांच्या एका तुकडीने संबंधित बंद कक्षाचे कुलूप तोडून इन कॅमेरा तपासणी केली. त्यावेळी कक्षात सापडलेली रोकड मोजण्यासाठी तीन यंत्रे मागविण्यात आल्याचा संदर्भ दानवे यांनी या वेळी सांगितला. याची चौकशी करण्याची मागणी दानवे यांनी केली.