कराड : पावसाळ्यात पूर येऊन संपर्क तुटणाऱ्या आणि संभाव्य पूरबाधित गावात आत्तापासूनच संबंधित यंत्रणेने समन्वयाने उपाययोजना राबवाव्यात. कोठेही आपत्ती आली तरी तातडीने तेथे यंत्रणा पोहोचेल, अशी तयारी ठेवावी. सतर्कतेसह उपाययोजना करण्यात हयगय करतील त्यांच्यावर कारवाई होणारच, असा इशारा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिला. कराडमध्ये एक जूनपासून व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित होत असल्याचे ते म्हणाले.
कराडमध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित आपत्ती व्यवस्थापन बैठकीत ते बोलत होते. तहसीलदार कल्पना ढवळे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, कराड पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
प्रांताधिकारी म्हेत्रे म्हणाले, कराड तालुक्यात कृष्णा, कोयनेसह तारळी, उत्तरमांड, दक्षिणमांड व वांग अशा एकूण सहा नद्या आहेत. या नद्यांच्या काठावर ७७ गावे आहेत. पूरस्थितीत यातील ३८ गावे बाधित होतात, तर कोयनाकाठावरील तांबवे, कृष्णा काठावरील आटके, जाधवमळा, दुशेरे, दक्षिणमांड काठावरील टाळगाव व वांग नदीकाठावरील आणे या सहा गावांचा संपर्क तुटतो. त्या गावात आत्तापासूनच आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने कार्यवाही करावी. कराड शहरासह नदीकाठच्या गावांतील नदीकाठची अतिक्रमणे, बेकायदा झोपड्या हटवाव्यात, धोकादायक इमारतींबाबतही उचित कार्यवाही करण्याचे आदेश प्रांताधिकारी म्हेत्रे यांनी दिले आहेत.
कराडमध्ये दाखल असलेले राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) पथक भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा कर्तव्यावर बोलावण्यात आले होते. आता हे जवान पुन्हा कराडला येणार असून, त्यांच्याकडून २९ आणि ३० मे या दोन दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी पूरपरिस्थिती व आपत्तीच्या अनुषंगाने बचावाचा प्रतीकात्मक प्रयोग (मॉक ड्रील) होणार आहे. आपत्ती निवारण साहित्याची देखभाल, दुरुस्ती करण्याचे कामही गतीने सुरू असून, या कोणत्याही कामात कसूर राहू नये, असे प्रांताधिकारी म्हेत्रे यांनी संबंधित प्रशासनाला बजावले आहे.