-दत्तात्रय भरोदे

शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात बर्ड फ्लूने शिरकाव केला असून, तालुक्यातील पाषाणे या गावात बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने एक किलोमीटर परिघातील पक्षी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली आहे. तसेच, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

आठ दिवसांपूर्वी पाषाणे येथील एका पोल्ट्री धारकाच्या सुमारे ३५० गावठी कोंबड्या दगावल्या होत्या.  याबाबत पशुसंवर्धन विभागाचे डॉ. अमोल सरोदे यांनी मृत पक्षांचे नमूने प्रथम पुणे येथे व तेथून भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान यांच्याकडे पाठवले होतं. त्याबाबतचा अहवाल भोपाळ येथून आज(गुरुवार) प्राप्त झाला असून त्यामध्ये बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त होताच प्रशासकीय यंत्रणा सक्रीय झाली असून पाषाणे येथून एक किलोमीटर परिसरातील एक हजार कोंबड्या नष्ट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ठाणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार  पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त सहाय्यक आयुक्त डॉ. अमोल सरोदे यांच्यासह शहापूर पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या पथकाने शास्त्रोक्त पद्धतीने पक्षी नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली आहे. तसेच बाधित क्षेत्राच्या परिघातील पक्षी खाद्य व अंडी देखील शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करावयाची असून, एक किलोमीटर परिघातील चिकन विक्रेते, वाहतूकदार यांचे दैनंदिन कामकाज बधितक्षेत्र संसर्गमुक्त होईपर्यंत रोखण्यात यावे असे आदेश ठाणे जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. दरम्यान, कोणीही घाबरून जाऊ नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन शहापूर तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांनी केले आहे.