लातूर : नीट परीक्षेसाठी देशातील 23 लाखाच्या वर विद्यार्थी परीक्षेस बसणार असून लातूर जिल्ह्यातून 20,801 विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत .जिल्ह्यात 51 केंद्रावर ही परीक्षा रविवार दिनांक 4 मे रोजी दुपारी दोन ते पाच या वेळेत होणार असून परीक्षेच्या केंद्रावर दीड वाजण्यापूर्वीच विद्यार्थ्यांनी पोहोचावे लागणार आहे .प्रशासनाच्या वतीने परीक्षेची जय्यत तयारी केली असून परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत .परीक्षा केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी येणार असल्यामुळे परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर व परिसरात गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही काळजी घेतली जात आहे.

सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्या शंभर मीटरच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. दयानंद विज्ञान महाविद्यालयात केंद्रप्रमुख व उपप्रमुख यांची कार्यशाळा शुक्रवारी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी घेतली व संबंधितांना सूचना केलेल्या आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रामध्ये अचूक वेळ दाखवणारे घड्याळ असावे, विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था योग्य असावी, परीक्षा केंद्रामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा चालू स्थितीत असावी ,प्रत्येक खोलीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था असावी आदी मागण्या पालकांच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थ्यांची तपासणी करताना रांगा लावल्या जातात त्यांना उन्हाचा त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी ही मागणी पालकांकडून करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी परीक्षार्थींना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी सकाळपासून शहरातील वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी वाहन तळाचे नियोजन करण्याच्या ही सूचना देण्यात आलेल्या आहेत .प्रत्येक परीक्षा केंद्रात उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन ओआरएस व पिण्याचे पाणी उपलब्ध केले जाणार आहे .आरोग्य विभागामार्फत प्रथमोपचार साहित्यासह आरोग्य कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्र परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर परीक्षेच्या दिवशी बंद राहणार आहेत. परीक्षार्थींसाठी शहर बस वाहतुकीच्या विशेष फेऱ्यांचे नियोजनही केले जाणार आहे.