सोलापूर : साखर कारखान्यांना गळीत हंगामात ऊसतोड मजूर पुरविण्याच्या नावाखाली साखर कारखाने व ऊस वाहतूकदारांची मोठी आर्थिक फसवणूक होते. गेल्या १६ वर्षांत राज्यात ८१ साखर कारखान्यांची ऊसतोड मजूर मुकादमांकडून सुमारे ३९ कोटी ४७ लाखांची फसवणूक झाली आहे. भाजपचे नेते, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी यासंदर्भात विधान परिषदेत तारांकित प्रश्न मांडला असता साखर कारखाने व ऊस वाहतूकदारांच्या फसवणुकीची माहिती समोर आली.

माढा तालुक्यातील बेंबळे येथील ऊस वाहतूकदार प्रशांत भोसले हे मध्यप्रदेशात ऊसतोड मजूर आणायला गेले असता तेथे आर्थिक फसवणूक करून त्यांची हत्या झाली होती. याच अनुषंगाने राज्यातील साखर कारखान्यांची, ऊस वाहतूकदारांची ऊसतोड मजूर व मुकादमांकडून होणाऱ्या फसवणुकीचा प्रश्न आमदार मोहिते-पाटील यांनी विधान परिषदेत गाळप हंगाम २००४ ते २०२० या १६ वर्षांच्या कालावधीत राज्यातील ८१ साखर कारखान्यांची ऊसतोड मुकादमांकडून ३९ कोटी ४६ लाख ८४ हजार ३२२ रुपयांची फसवणूक झाल्याची कबुली शासनाने दिली. ऊसतोड मजूर व मुकादमांकडून ऊस वाहतूकदार व साखर कारखानदारांच्या होत असलेल्या फसवणुकीच्या प्रकारांवर आळा घालण्याबाबत तसेच ऊसतोड मजूर व मुकादमांची गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर कल्याण महामंडळाकडे नोंदणी करून महामंडळामार्फत ऊसतोड कामगार ज्या ठिकाणी वास्तव्याला आहेत व जे मागील तीन वर्षे ऊसतोड कामगार म्हणून काम करीत असतील, त्यांची संबंधित गावच्या ग्रामसेवकाने विहित नमुन्यात नोंदणी करून ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय राज्यातील ऊसतोड कामगारांच्या सर्वेक्षण व नोंदणीसाठी वेब व मोबाईल अ‍ॅप्लिकेशन महाआयटीमार्फत करुन घेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यानुसार ऑनलाईन नोंदणीकरिता वेब पोर्टल तयार करण्याची कार्यवाही गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या स्तरावर सुरू असल्याची माहिती सहकारमंत्री सावे यांनी दिली.