अहिल्यानगर: महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर हरकती दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ४१८ नागरिकांनी एकूण ४१ हरकती दाखल केल्या आहेत. या हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी तारीख व वेळ लवकरच जाहीर केली जाईल, असे मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.
काही नागरिकांनी एकाच भागाबाबत एकसारखी हरकत दाखल केली आहे. या हरकतींचे एकत्रीकरण करून एकूण ४१ हरकतींची नोंद मनपाकडे करण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या शिंदे गटाकडून प्रभाग १२, प्रभाग ९, प्रभाग १५ व १६, प्रभाग ५ व ६ मधील भागांच्या समावेशावर हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. तर, शिवसेनेच्या ठाकरे गटाने शासनाने दिलेले निर्देश डावलून रचना केल्याची हरकत नोंदवण्यात आली आहे.
आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार ३ सप्टेंबरला प्रसिद्ध करण्यात आला होता. या आराखड्यावर मुदतीमध्ये १५ सप्टेंबरपर्यंत ४१ हरकती दाखल झाल्या आहेत. एक हरकत वेळ संपल्यानंतर दाखल झाली आहे. प्रभागरचनेत विशेषतः मध्य शहरातील, कल्याण रस्त्यावरील शिंदे गटाच्या नगरसेवकांचा प्रभाव असलेल्या जुन्या प्रभागात मोठे फेरबदल झाले आहेत. त्यावर शिंदे गटाकडून आक्षेप घेण्यात आले आहेत. तर, प्रभाग १५ व प्रभाग १ मधील काही भागांच्या समावेशाबाबत अनुक्रमे १८६ व १३६ नागरिकांनी एकच हरकत दाखल केली आहे. त्याचे एकत्रीकरण करण्यात आले आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाने विविध १७ मुद्द्यांवर हरकत घेऊन जुनीच प्रभागरचना कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, महापालिका अधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या राजकीय सोयीसाठी सर्व निर्देश डावलून विरोधकांना अडचणीत आणण्याच्या दृष्टीने प्रभागरचना केल्याचा आरोप ठाकरे गटाचे शहरप्रमुख किरण काळे यांनी केला आहे. सन २०१८ व २०२५ या दोन निवडणुकां करिता २०११ च्याच जनगणनेचा आधार घेतला आहे. तरी जुन्या प्रभागांची मोडतोड केली आहे. कोणताही नवा भाग मनपा हद्दीत समाविष्ट झालेला नसताना प्रभागरचना पुनर्गठीत करण्यात आली. हे आक्षेपार्ह आहे. सबब २०१८ च्या रचनेप्रमाणेच निवडणूक घ्यावी. प्रभागरचनेचे कामकाज करताना मनपा अधिकाऱ्यांनी गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके व काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनीही हरकती दाखल करत सत्ताधाऱ्यांच्या मनाप्रमाणे प्रभागरचना केल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, महापालिकेकडे दाखल झालेल्या हरकतींवर सुनावणीसाठी तारीख व वेळ निश्चित करून जाहीर करण्यात येईल, असे आयुक्त डांगे यांनी सांगितले.