पालघर :पालघर जिल्ह्यात येणाऱ्या वेगवेगळ्या राष्ट्रीय प्रकल्पांच्या अनुषंगाने नव्या पिढीला भविष्यातील येऊ पाहणाऱ्या रोजगाराची संधी सहजगत उपलब्ध व्हावी यासाठी त्यांची शैक्षणिक प्रगती करण्याच्या दृष्टीने पालघर जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी निपुण पालघर गुणवत्ता विकास अभियान राबवण्याचे योजिले आहे. यामध्ये इयत्ता दुसरी ते आठवी इयत्ते मधील विद्यार्थ्यांचे अध्ययन क्षमता विकसन करणे तसेच अध्ययन निष्पत्ती विकसन करण्यासाठी १५ जुलै ते ३० ऑक्टोबर पर्यंत तीन टप्प्यात अभियानाची आखणी करण्यात आली आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० तसेच निपुण भारत अभियान अंतर्गत प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार विद्यार्थ्यांचे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित होण्यासाठी केंद्र व राज्यस्तरावरून विविध उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात येत आहे. बालवाटिका ते इयत्ता तिसरीच्या (वयोगट तीन ते नऊ वर्ष) या विद्यार्थ्यांना सन २०२६ अखेरीस पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करणे या दृष्टीने विविध वयोगटानुसार व इयत्तानिहाय लक्ष निर्धारित करण्यात आले होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षणाच्या स्तरांची पुनर्रचना करण्यात आली असून या धोरणात सुचविलेल्या नवीन संरचने पायाभूत स्तर बालवाटिका ते इयत्ता दुसरी तर पूर्वतयारी स्तर इयत्ता तिसरी ते पाचवी असा निर्धारित करण्यात आला असला तरीही पालघर जिल्हा परिषदेने निपुण पालघर गुणवत्ता विकास अभियान पालघर जिल्ह्यातील २१२० शाळांमधील विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेतले आहे.
सन २०१७ मधील राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात इयत्ता तिसरी (क्रमांक ३१), इयत्ता पाचवी (क्रमांक २९), इयत्ता आठवी (क्रमांक ३०) या स्तरावरून सन २०२१ मध्ये झालेल्या अशाच सर्वेक्षणात पालघर जिल्ह्याचे स्थान उंचावले आहे. २०२१ मध्ये इयत्ता तिसरी (क्रमांक २८), इयत्ता पाचवी (क्रमांक २५) व इयत्ता आठवी (क्रमांक २५) अशी सुधारणा झाली असली तरीही पालघर जिल्ह्याला या अभियाना नंतर राज्यातील पहिल्या १० क्रमांकामध्ये येण्याचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. आगामी काळात जिल्ह्यात होणाऱ्या विकासाच्या प्रवाहात नव्या पिढीला उद्यमशीलता व रोजगाराची संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हे अभियान महत्वपूर्ण असल्याचे श्री. रानडे यांनी प्रतिपादन केले.
तीन टप्प्यात राबवल्या जाणाऱ्या या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण घेत असलेल्या २.६८ लाख विद्यार्थ्यांच्या ओएमआर शीटवर पायाभूत चाचण्या घेऊन त्यांचे भाषण, वाचन, लेखन व गणन याची सद्यस्थिती अभ्यासली जाणार आहे. तर १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यातील तज्ञ व तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने तयार होणाऱ्या विशेष कृती पुस्तिकेच्या आधारे आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बोलते करणे व त्यांची क्षमता वाढ करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. याकरिता जिल्ह्यातील तज्ञ शिक्षकांचा गट तयार करीत असून त्यांच्या प्रशिक्षणाचे व कार्यशाळेचे आयोजन केले जात असल्याची माहिती सांगितली.
या अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात १६ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर दरम्यान या अभियानाची फलनिष्पत्तीची तपासणी केली जाणार असून प्रत्येक नियतीमधील ७५ टक्के मुलांना सर्व आवश्यक क्षमता प्राप्त करणे असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे साध्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करून प्रोत्साहित करण्याचे नियोजन करण्यात आले असून याकरिता विनोबा ॲप ची मदत घेण्यात येणार आहे. असे करताना नियमित अभ्यासक्रमासोबत उच्चक्षमता प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा व इतर स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे. ओएमआर शीट च्या माध्यमातून उत्तरपत्रिकाचे पृथकरण केले जाऊन विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या मर्यादांचा अभ्यास करून त्यांच्याकडे आवश्यकतेनुसार विशेष लक्ष देण्याची देखील या योजनेत अंतर्भूत आहे.
या अभियानावर जिल्हा परिषदेचे वर्ग एक ते वर्ग तीन मधील २८१ वरिष्ठ अधिकारी प्रत्येक शाळेत किमान दोनदा भेटी देणार असून जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ शाळा दत्तक देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून क्षेत्रभेटी एकाचवेळी देऊन शाळांची सखोल तपासणी करणे व त्रुटी दूर करण्यास प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सोनाली मातेकर यांनी याप्रसंगी सांगितली. या अभियानानंतर शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीचे उपक्रम वर्षभर सुरू ठेवण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त करत निपुण दोन अभियान राबवण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
निपुण पालघर गुणवत्ता विकास अभियान उद्देश
विद्यार्थ्यांची गुणवत्ता व प्रगती जाणून घेणे व त्यांची गुणवत्ता वाढवणे
शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी मूल्यांकन व विश्लेषण
शाळांचा भौतिक व रचनात्मक विकास करणे
प्रत्येक शाळा केंद्र तालुका यांचे शैक्षणिक स्थळ ठरविणे
शिक्षण अधिकारी व कर्मचारी यांची क्षमतावृद्धी करणे
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चा मागोवा घेणे
अभियानाचा पहिला टप्पा
अभियानाच्या पहिल्या टप्प्यात भाषण, वाचन, लेखन व गणन यांची मूल्यांकन व विकसित करण्याची क्षमता ओळखणे व त्याआधारे शाळांची व शिक्षकांनी वर्गातील विद्यार्थ्यांचे अध्ययन क्षमता स्तर ठरविणे, अध्ययन स्तर पडताळणीसाठी पत्र विकसन, पूर्व चाचणी व उत्तर चाचणी विकसित करणे व त्या आधारे विद्यार्थ्यांची मूल्यमापन करणे, स्तर पडताळणीची माहिती डेटा संकलित करणे व केंद्रनिहाय तालुका निहाय अहवाल प्रसिद्ध करणे, प्रगत व मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांची वर्गवारी करणे
अभियानाचा दुसरा टप्पा
अध्ययन क्षमता व अध्ययन निष्पत्ती विकसन कृती कार्यक्रम राबवणे, ४५ दिवस कृति पुस्तिकेच्या आधारे अध्ययन समृद्धी गुणवत्ता विकास अभियान राबवणे, अधिकारी व कर्मचारी यांना अप्रगत शाळा दत्तक देणे, विविध शैक्षणिक साहित्य अध्यापन पद्धतीचा वापर करून अप्रर्गत मुलांना प्रगत करणे, अध्ययनक्षमता व अध्ययन निष्पत्ती तपासणीसाठी चाचणी आयोजन करणे, चाचणी डेटा संकलित करून केंद्र व तालुका निहाय प्रसिद्ध करणे, शाळा अप्रगत ठेवणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यावर योग्य कारवाई करणे चांगली कामगिरी बजावणाऱ्या प्रोत्साहित करणे.
आनंददायी शिक्षण देण्यासाठी विशेष कृतिपुस्तिका तयार करण्यासाठी तज्ञ शिक्षकांच्या गटाकरिता आयोजित केलेल्या कार्यशाळेत सहभागी जिल्ह्यातील तज्ञ व तंत्रस्नेही शिक्षक यांचे जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतचे छायाचित्र