पालघर : बोईसर औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर करोना संसर्गाची शक्यता

४० हजारांहून अधिक बाधित असण्याचा अंदाज

प्रतिकात्मक छायाचित्र

तारापूर औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या गावांमध्ये करोनाचा मोठा फैलाव झाल्याची शक्यता असून या भागातील आजाराची तपासणी वाढवल्याने या भागात दररोज सुमारे १०० नवीन रुग्ण आढळून येत आहेत. या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून काढण्यास मनुष्यबळाच्या मर्यादा येत असून बोईसर व औद्योगिक वसाहत परिसरातमध्ये करोनाचे ४० हजार रुग्ण असल्याची शक्यता आरोग्य विभागाकडून व्यक्त केली जात आहे.

बोईसर, काटकरपाडा, खैरेपाडा, सरावली, बेटेगाव, कोलवडे, कुंभवली, पाम, टेंभी, सालवड, पास्थळ या गावांमध्ये तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कामगार वर्ग वास्तव्य करीत असून या परिसरात करोना आजाराचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाल्याचे दिसून येत आहे. आरोग्य यंत्रणेने गेल्या काही दिवसांपासून तपासणी वाढवल्याने दररोज ९० ते ११० रुग्ण या परिसरातून आढळून येत आहेत.

नगरपरिषदेची व्याप्ती असलेल्या परिसरात आठ ते दहा लहान-मोठ्या ग्रामपंचायती असल्याने तसेच ग्रामपंचायतींमध्ये कर्मचारी संख्या मर्यादित असल्याने या आजाराचा प्रसार रोखण्यास मर्यादा येत आहेत. त्याच पद्धतीने तालुका आरोग्य यंत्रणेकडे मर्यादित मनुष्यबळ असल्याने प्रसाराच्या अनुषंगाने तपासणी करण्यास अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बोईसरमधील एका बलाढ्य इस्पात उद्योगांनी आपल्या कर्मचाऱ्यांची तपासणी हाती घेतली असता अडीच हजार कामगारांपैकी सुमारे दोनशे (आठ टक्के) कामगार करोनाबाधित असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या उद्योग समुहात इतर तीन ते साडेतीन हजार कामगारांची तपासणी शिल्लक असून या कंपनीतील रुग्ण संख्या एक हजाराच्या पुढे जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

बोईसर परिसरातील दाटीवाटीच्या कामगार वसाहतीमध्ये तसेच एका खोलीत दहा ते पंधरा कामगार राहत असल्याने अनेकांना करोना संसर्ग झाला असावा तसेच संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ४० हजारांच्या जवळपास असावी असे एका आरोग्य अधिकार्‍यांने खासगीत लोकसत्ताला सांगितले. या सर्वांची तपासणी करण्यासाठी हंगामी पद्धतीने मनुष्यबळ भरती करणे किंवा जिल्ह्यातील इतर ठिकाणाहून आरोग्य सेवक व कर्मचारी तपासणी कामासाठी आवश्यक झाले आहे. परिसरात अधिक प्रमाणात फिवर क्लिनिकची उभारणी करणे, मध्यवर्ती ठिकाणी ऑंटीजन टेस्टिंग सुविधा कार्यरत करणे काळाची गरज आहे.

बोईसर येथे शासनाने सुरू केलेल्या टीमा रुग्णालयाची क्षमता ५० वर वाढविण्यात यावी अशी मागणी पुढे येत आहे. आजाराची लक्षणे दिसत नसलेल्या रुग्णांना बोईसर कंबळगाव येथे सुरू केलेल्या विलगीकरण कक्षात भरती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याच पद्धतीने टीमा सभागृहांमध्ये आजाराची तपासणी करण्यासाठी मध्यवर्ती सुविधा करण्याचे प्रस्तावित असून या सर्वांकरिता नियोजन, मनुष्यबळ व निधीची आवश्यकता भासणार आहे. एकंदरीत आशिया खंडातील सर्वात मोठ्या औद्योगिक वसाहतीमधील हा भाग करोनाच्या मोठ्या प्रमाणावर बाधित असण्याची शक्यता आहे.

बोईसर परिसरातील पाच मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये दीड लाखांची लोकसंख्या असून त्यांपैकी २५ ते ३० टक्‍के नागरिकांना करोनाची बाधा झाल्याची शक्यता आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. याकरिता ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींकडून मनुष्यबळ व निधीची मर्यादा येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Palghar possibility of large scale corona infection in boisar industrial area aau

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या