अलिबाग –  सर्वत्र सध्‍या गणेशोत्‍सवाची धूम सुरू झाली आहे. कोकणातील घरोघरी गणरायाचं आगमन झालं आहे. परंतु रायगड जिल्‍ह्यातील एक गाव असं आहे ज्‍या गावातील एकाही घरी गणरायाची प्रतिष्‍ठापना केली जात नाही तरीदेखील इथं गणेशोत्‍सव साजरा केला जातो. माणगाव तालुक्‍यातील साले ग्रामस्‍थांनी वर्षानुवर्षे सुरू असलेली ही परंपरा आजही जपली आहे.

गणेशोत्‍सव म्‍हणजेच कोकणचा सर्वांत आवडता सण. गणेशोत्‍सवातील दिवसात इथं उत्‍साह ओसंडून वहात असतो  गणरायाचं आगमन होतं आणि मग पूजा अर्चा , आरती नाचगाणी सारी धमाल असते . परंतु रायगड जिल्‍हयाच्‍या माणगाव तालुक्‍यातील साले गावातील गणेशोत्‍सव आगळाच. जवळपास सव्‍वाशे उंबरयांच्‍या या गावातील एकाही घरात गणेश चतुर्थीच्‍या दिवशी गणरायाच्‍या मूर्तीची प्रतिष्‍ठापना केला जात नाही.मात्र येथील ग्रामस्‍थ एक दिवसाचा गणेशोत्‍सव मोठया आनंदात आणि भक्‍तीमय वातावरणात साजरा करतात.

गणेश चतुर्थीच्‍या दिवशी गावातील सर्व ग्रामस्‍थ गावातील शिवगणेश मंदिरात जमतात. मंदिरात भजन होते पूजन होते. नवस बोलले जातात पुर्वी बोललेले नवस फेडले जातात. मंदिरातून गणपतीच्‍या पालखीची वाजतगाजत मिरवणूक निघते. मंदिराच्‍या शेजारीच असलेल्‍या गंगातलावातून या पालखीची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. कंबरभर पाण्‍यातून ही मिरवणूक तलावाच्‍या दुसरया बाजूला येते. सोबत भजनी मंडळ असते.

त्‍यानंतर या पालखीची वाजतगाजत गावातून मिरवणूक निघते. घरोघरी पालखीचे पूजन होते. गणरायाची मनोभावे पूजा केली जाते. त्‍यानंतर पुन्‍हा मंदिरात या पालखी मिरवणूकीची सांगता होते . हा आगळावेगळा गणेशोत्‍सव नेमका कधी आणि कसा सुरू झाला हे आजच्‍या पिढीलाही माहिती नाही .मात्र वर्षानुवर्षे सुरू असलेली ही परंपरा आजच्‍या पिढीनेही जपली आहे .

घरोघरी गणरायाचं आगमन होत नसलं तरी एक दिवसाच्‍या या उत्‍सवासाठी  गावात मुंबईकर चाकरमानी हमखास हजेरी लावतात. माहेरवाशिणी, महिलावर्गही मोठया  संख्‍येने या उत्‍सवात सहभागी होत असतो . केवळ गावातीलच लोक नाही तर पंचक्रोशीतील भाविकही हा सोहळा अनुभवण्‍यासाठी साले गावात येतात . एक गाव एक संकल्‍पना  रूजवण्‍याचे प्रयत्‍न गेल्‍या अनेक वर्षांपासून होताहेत . परंतु साले गावच्‍या ग्रामस्‍थांनी वर्षानुवर्षे ही परंपरा जपली असून ती नक्‍कीच अनुकरणीय आहे.

ही परंपरा कधी सुरू झाली हे गावातील कुणालाच माहिती नाही. पण सर्व ग्रामस्‍थ एकत्र येवून हा उत्‍सव साजरा करतात. त्‍यानिमित्‍ताने एक गाव एक गणपती ही संकल्‍पना देखील साकारली जाते. महत्‍वाचे म्‍हणजे गावच्‍या एकोप्‍याचे दर्शन घडते.- शैलेश भोनकर, ग्रामस्‍थ

आम्‍ही मुंबईला असतो पण दरवर्षी या उत्‍सवाला आवर्जून हजेरी लावतो. गावातील नोकरदार कुठेही असला तरी देवाला भेटायला आणि बाप्‍पाला फूल वहायला येतातच. सगळे ग्रामस्‍थ , महिला यानिमित्‍ताने एकत्र येवून हा उत्‍सव साजरा करतात. खूप धमाल येते.-श्‍वेता भोनकर, तरूणी