सोलापूर : नात्याने भाची असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला पंढरपूरच्या सत्र न्यायालयाने दोषी ठरवून २० वर्षे सक्तमजुरी आणि दोन लाख दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.पंढरपूर तालुक्यातील एका गावात एप्रिल २०२२ मध्ये पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. घटनेच्या वेळी संबंधित मुलगी घरात एकटीच असल्याचे पाहून आरोपीने हे कृत्य केले. यातून पीडिता गरोदर राहिली. या संदर्भात करकंब पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नीलेश तारू यांनी करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र पत्र सादर केले होते.
या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. देसाई यांच्या समोर झाली असता सरकारतर्फे ॲड. किरण बेंडवार यांनी १५ साक्षीदार तपासले. त्यांनी आपल्या युक्तिवादात, महिला व बाल अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे आणि अशा प्रकारच्या ८० टक्के घटनांमध्ये खटल्यातील आरोपी हा ओळखीचा, शेजारी अथवा जवळचा नातेवाईक असतो. या खटल्यातील आरोपी पीडितेचा मामा असताना नात्याला काळिमा फासणारे दुष्कृत्य त्याने केले आहे.
एखाद्या खुनाच्या गुन्ह्यात एखाद्या व्यक्तीच्या शरीराचा खून होतो. परंतु अशा बाललैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात पीडितेच्या मनाचा खून होतो. गुन्ह्याचे गांभीर्य बघता आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावताना वसूल झालेला दोन लाख दोन हजारांचा दंड पीडितेला द्यावा. तसेच पीडितेला नुकसानभरपाई देण्यात यावी, असा आदेश दिला आहे. आरोपीतर्फे ॲड. मिलिंद थोबडे यांनी बचाव केला.