पंढरपूर : आषाढी एकादशीपूर्वी शहरात एकाच वेळी ४२ ठिकाणी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या मोहिमेत सोलापूर जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक, विविध सामाजिक संघटना, पंढरपूर शहरातील नागरिक यांनी सक्रिय सहभाग घेऊन ही विठुरायाची नगरी बहुतांश स्वच्छ केली आहे. या मोहिमेतून पंढरपूर शहर व येथे येणाऱ्या हजारो भाविकांच्या घरोघरी स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्याचे क्रांतिकारी कार्य घडले असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

येथे शहर महास्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओम्बासे, माजी आमदार प्रशांत परिचारक, पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख व मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री गोरे म्हणाले की, या स्वच्छता अभियानातून श्री विठुरायाची नगरी स्वच्छ करण्याचे काम आपल्या सर्वांच्या श्रमातून झालेले आहे. ही वारीपूर्वीची स्वच्छता असून वारीनंतरही स्वच्छता करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी सोलापूर जिल्ह्यासह सातारा जिल्ह्यातील ही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला असून आजच्या मोहिमेत सात ते आठ हजार स्वयंसेवक नागरिकांनी सहभाग घेतला, असे त्यांनी सांगितले.

पंढरपूर शहरातील सर्व नागरिक व्यापारी, व्यावसायिक यांनी आपापल्या दुकानांसमोर कचरा टाकण्यासाठी छोट्या छोट्या कचरापेट्या ठेवाव्यात व त्यामध्येच कचरा टाकून तो नगरपालिकेच्या कचरा संकलन टीमकडे द्यावा, असे आवाहन पालकमंत्री गोरे यांनी करून स्वच्छ पंढरपूर, स्वच्छ चंद्रभागा, नमामी चंद्रभागा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. प्रारंभी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी प्रास्ताविकात स्वच्छता अभियानाचे महत्त्व सांगून प्रशासनाच्या वतीने येथे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा देण्याबरोबरच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. तर मोहिमेत सर्वांनी सहभाग घेतल्याबद्दल मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी आभार मानले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘सफाई मित्रांचा’ सन्मान

या महास्वच्छता अभियानात सहभाग घेऊन स्वच्छता मोहीम राबवलेल्या काही सफाई मित्रांचा प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये लक्ष्मण गोविंद सोनवणे, रविकिरण दोडिया, श्रीमती शांता विठ्ठल वाघमारे, अजय शंकर तावरे, ओंकार जनार्दन वाघमारे यांच्यासह कोळगाव ग्रामपंचायत, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. तसेच लायन्स क्लब पंढरपूर, वृक्षप्रेमी ग्रुप पंढरपूर, एव्हर ग्रीन क्लब, क्रीडाई संस्था व लोकमान्य विद्यालय पंढरपूर यांचा सत्कार करण्यात आला.