मृत्यू हे माणसाच्या आयुष्यातलं शाश्वत सत्य असतं. एखाद्या माणसाचा मृत्यू झाला की तो सुटला असं म्हणतात. मात्र पंढरपूरमध्ये स्मशानातल्या सोन्याच्या हव्यासापोटी राख आणि अस्थींची चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मृत्यूनंतर मृतदेहांची परवड थांबत नसल्याचं चित्र आहे.
काय घडतोय प्रकार? ग्रामस्थांनी काय म्हटलं आहे?
एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर पंढरपूरच्या स्मशानभूमीत त्या व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात. दुसऱ्या दिवशी नातेवाईक जेव्हा राख सावरण्यासाठी जातात आणि अस्थी घ्यायला जातात तेव्हा मृतदेहाच्या अंगावर असलेलं सोनं राखेत किंवा अस्थींमध्ये मिसळलं असेल या हव्यासापोटी राख आणि अस्थी चोरीला गेल्याची बाब लक्षात येते आहे. हे प्रकार पंढरपूरमध्ये वारंवार घडू लागले आहेत. अंत्यविधींनंतर मागे उरणारी राख आणि अस्थी गायब होत आहेत म्हणून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
रखमाबाई देवकर यांच्या अस्थी मिळाल्या नाहीत
बुधवारी सकाळी रखमाबाई देवकर यांच्या अस्थी सावरण्यासाठी कुटुंबीय मोठ्या संख्येने स्मशानभूमीत पोहचले तर त्यांच्या मृतदेहाच्या अस्थी गायब होत्या. अस्थी नसल्याचं दिसताच या सगळ्या कुटुंबीयांना धक्का बसला. अनेक समाजांमध्ये मृतदेहाच्या अंगावरचे दागिन ने काढण्याची पद्धत आहे. महिलेचा मृत्यू झाल्यास तिच्या मृतदेहावर मंगळसूत्र किंवा इतर दागिने असतात जे काढले जात नाहीत. याच सोन्याच्या हव्यासापोटी चोरटे राखेसह अस्थी पळवून नेत आहेत. रखुमाई देवकर यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या अस्थी मिळाल्या नाहीत हे पाहून देवकर यांच्या कुटुंबीयांनी टाहो फोडला.
दागिने चोरीला गेल्याचं आम्हाला दुःख वाटत नाही. मात्र राखेसह अस्थीच चोरीला गेल्या आहेत याचं आम्हाला वाईट वाटतं आहे असं देवकर यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. राखेसह अस्थीच चोरून नेल्या जात असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. मृत्यूनंतर मृतदेहांची अवहेलना होत असल्याने अनेक लोक संतप्त झाले आहेत.