पंढरपूर : कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पंढरपूर शहरातील मंदिर परिसर २७ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ५ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत आणि १ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत २४ तास या वेळेकरिता हा परिसर वाहन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कुमार आशीर्वाद यांनी लागू केला आहे. दरम्यान, कार्तिकी एकादशी २ नोव्हेबर रोजी आहे.

दरम्यान प्रतिबंध क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे वावरणाऱ्या वाहनावर जप्तीची कारवाई करून ही वाहने पोलीस स्टेशन पंढरपूर येथे दंडात्मक कारवाईसाठी जमा करण्यात येणार आहेत. तसेच, या वाहनावर मोटार वाहन कायदा १९८८ मधील तरतुदीनुसार मोठ्या रकमेची दंडात्मक कारवाई होणार असल्याचेही या आदेशात म्हटले आहे. याशिवाय राजशिष्टाचार पात्र व्यक्तींसाठी, तसेच दिव्यांग व्यक्तीसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने श्रीकृष्ण मंदिर, चौफाळ्यापासून ने-आण करण्याकामी पर्यावरणपूरक वाहनांची व्यवस्था करावी असेही या आदेशात म्हटले आहे.

कार्तिकी यात्रा कालावधीत शहरात येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता, श्रीकृष्ण मंदिर, चौफाळा, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पश्चिम द्वार, मंदिर परिसर, महाद्वार चौक परिसर या भागात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. गर्दी व्यवस्थापनासाठी प्रशासनास अडचणी निर्माण होतात. शहर व परिसरातील वाहतूक व दर्शन रांग सुरळीतपणे मार्गी लागण्यासाठी व यात्रा कालावधीत शांतता व सुरक्षितता राहावी, यासाठी हे वाहन प्रतिबंधक आदेश लागू करण्यात आले आहेत.

मंदिर परिसरात व्यवसाय करणाऱ्यांच्या मालाची ने-आण करण्यासाठी पोलीस प्रशासनाशी चर्चा करून भाविकांची गैरसोय होणार नाही, अशी ठरावीक वेळ निश्चित करून त्या दरम्यान वाहतूक होईल, याची दक्षता घ्यावी. महत्त्वाचे, तसेच राजशिष्टाचार पात्र व्यक्तींसाठी, तसेच दिव्यांग व्यक्तीसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने श्रीकृष्ण मंदिर, चौफाळ्यापासून ने-आण करण्याकामी पर्यावरणपूरक वाहनांची व्यवस्था करावी.

आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्याच्या दृष्टीने वाहन प्रतिबंध क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे वावरणाऱ्या वाहनावर जप्तीची कारवाई करून ही वाहने पोलीस स्टेशन पंढरपूर येथे दंडात्मक कारवाईसाठी जमा करण्यात यावी. तसेच, सदर वाहनावर मोटार वाहन कायदा १९८८ मधील तरतुदीनुसार मोठ्या रकमेची दंडात्मक कारवाई अनुसरण्यात यावी. ही रक्कम वाहनधारकांकडून रोखीने वसूल करण्यात यावी.

या आदेशाचे उल्लंघन झाल्यास उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये, तसेच भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम २२३ अन्वये कारवाईस पात्र राहील, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.