पंढरपूर शहर भाजपा अध्यक्ष आणि निर्भिड आपलं मत या स्थानिक वृत्तपत्राचे संपादक संजय अंबादास वाईकर (वय ५१) यांचे करोना विषाणूमुळे निधन झाले आहे. दहा दिवसांपूर्वी वाईकर यांचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर वाखरी येथील कोविड सेटंरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृती खालावल्यामुळे त्यांना सोलापूरला हलवण्यात आलं.
सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दोन दिवसांपासून वाईकर यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान वाईकर यांचं रक्तदाब आणि शुगरचं प्रमाण वाढल्यामुळे आज, पहाटे मृत्यू झाला. वाईकर यांच्यावर सोलापुरातील स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वाईकर यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.
वाईकर यांनी दै. प्रभात, दै. निर्भिड आपलं मत, साप्तिहिक आपलं मत च्या माध्यमातून सुमारे दहा वर्ष पत्रकारिता केली. गेल्या तीन वर्षांपासून वाईकर भाजपाचे पंढरपूर शहर अध्यक्ष म्हणून काम पाहत होते.
दरम्यान, पंढरपूरात एकूण ३५९ रूग्ण असून २३४ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १२० जण बरे होऊन घरी परतले असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे.