भाजपाच्या वरिष्ठ नेत्या, माजी मंत्री आणि लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झालेल्या उमेदवार पंकजा मुंडे यांचं पक्षाने राजकीय पुनर्वसन करावं, अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केली जात होती. २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास सुरू झाला होता. त्यानंतर भाजपाने यंदा त्यांना त्यांच्या बहिणीच्या म्हणजेच माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, पंकजा मुंडे विधानसभेपाठोपाठ लोकसभेलाही अपयशी ठरल्या. दरम्यान, आता पुन्हा एकदा त्यांचा राजकीय वनवास सुरू होतोय असं दिसत असतानाच त्यांना पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे.

पुढच्या महिन्यात विधान परिषदेची निवडणूक होत असून भाजपाने पाच जागांवर त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. या जागांवर उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक नेते पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी करत होते. दरम्यान, महाराष्ट्रात चालू असलेल्या मराठा-ओबीसी आरक्षण वादाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे.

पंकजा मुंडेंच्या उमेदवारीवर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत असताना मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीदेखील यावर भाष्य केलं आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, “या निर्णयाला चुकीचा निर्णय म्हणण्याचं कारण नाही आणि चांगला म्हणण्याची आवश्यकता नाही. या निर्णयामुळे आम्हाला दुःख होण्याचं कारण नाही. आम्ही त्यावर काही नकारात्मक प्रतिक्रिया देणार नाही. कारण आम्ही काही जातीयवादी नाही. आम्ही त्यांना निवडणुकीत पाडा असं देखील म्हणालो नव्हतो. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा आमच्या समाजावर काही परिणाम होण्याचं कारण नाही. आम्ही समाज म्हणून एकत्र आहोत आणि एकजुटीने राहणार आहोत. एकजुटीने आम्ही आरक्षणासाठी लढा देणार आणि ओबीसीतूनच आरक्षण मिळवणार आहोत.”

हे ही वाचा >> “भाजपात जुम्मा-जुम्मा चार दिवस झालेला माणूस मला…”, सभागृहातील राड्यानंतर अंबादास दानवेंचा प्रसाद लाडांवर हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला की भाजपा पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या या निर्णयाचं तुम्ही स्वागत करणार का? त्यावर मनोज जरांगे म्हणाले, “या निर्णयाचं स्वागत करणारा मी कोण आहे? मी स्वागत केल्याने किंवा न केल्याने त्यांना (पंकज मुंडे आणि भाजपा) काही फरक पडणार आहे का? त्यांना काही फरक पडणार असेल तर मी कौतुक करेन.”