नाशिकच्या जागेवरून भाजपा शिंदे गट आणि अजित पवार गट या तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच प्रीतम मुंडे यांना मी नाशिकमधून उभी करेन, असं विधान पंकजा मुंडे यांनी केले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चाही रंगू लागल्या होत्या. यावरून अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनीही पंकजा मुंडेंनी आधी बीडमध्ये लक्ष द्यावं, असा सल्ला दिला होता. दरम्यान, या विधानाबाबत आता पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते विधान मी गंमतीने केलं होते. असे त्या म्हणाल्या. बीडमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

मी प्रीतम मुंडेंसाठी उमेदवारी मागितली असं काहीही नाही. गैरसमज करून घेणाऱ्या लोकांच्या नासमझपणाचे हे लक्षण आहे. हा विषय मी सहज बोलले होते. प्रीतम मुंडे या १० वर्ष खासदार असताना आता त्यांच्याऐवजी मला उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळेच प्रीतमताईंचे सासर नाशिककडे आहे, त्यांना तिकडे पाठवून देऊ, असे मी गंमतीने बोलले होते. हा विषय इतका वाढवण्याची आवश्यकता नव्हती, असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिले.

हेही वाचा – “हा ओबीसींची मतं मिळवण्यासाठी केलेला…”, प्रकाश शेंडगेंना मिळालेल्या धमकीप्रकरणी मनोज …

पुढे बोलताना त्यांनी बीडमधून विजयी होण्याचा विश्वासही व्यक्त केला. मी मागील काही दिवसांपासून बीडमध्ये सभा आणि बैठका घेत आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र, या प्रतिसादाचे रुपांतर मतांमध्ये किती होईल, हे निकालाच्या दिवशी समजेल. मात्र, मला माझ्या विजयाचा विश्वास आहे, असे त्या म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?

दरम्यान, २४ एप्रिल रोजी बीडमधील एका सभेत बोलताना प्रीतम मुंडे यांना मी नाशिकमधून उभं करेन, अस विधान पंकजा मुंडे यांनी केले होते. “प्रीतम ताईंना विस्थापित करणार नाही, मी हा शब्द दिला होता. मला तिकीट देऊ नका, असं म्हणूनच मी सगळीकडे गेले होते. मात्र, मला हे आता लक्षात आलं की, ही निवडणूक कशाची आहे. ताईचं (प्रीतम मुंडे) कुठेही अडणार नाही. त्यांना मी नाशिकमधून उभे करेल, तुम्ही काळजी करू नका. ताईचं राजकारण हे गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पाश्चात होतं. पण मी मुंडे साहेब असताना त्यांचा हात बनले होते”, असं त्या म्हणाल्या होत्या.