बीड: विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाल्यानंतर अनेक राजकीय घटना घडल्या. चार वर्षांत दोन डझन आमदार, खासदार झाले. त्यामध्ये मी बसत नसेल तर लोक चर्चा करणारच. ती चर्चा मी ओढवलेली नाही. त्यामुळे माझ्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जातात. माझे नेते केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी सर्व घटनांबाबत सविस्तर चर्चा करून माझ्यासाठी तुमच्या मनात काय आहे, असे विचारेन आणि त्यानंतर काय होईल ते सर्वासमोर येऊन ठरवेन. निर्णय घेण्यासाठी मला कोणत्याही आडपडद्याची गरज नाही, अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपली व्यथा मांडत पक्षांतर्गत विरोधकांना इशारे दिले.
बीड जिल्ह्यातील गोपीनाथगड (ता. परळी) येथे शनिवार, ३ जून रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन झाल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.या वेळी खासदार डॉ. प्रीतम मुंडे, खासदार सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, नमिता मुंदडा, सुरेश धस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मी वेळोवेळी माझी भूमिका मांडली आहे. माझे म्हणणे माध्यमांनी कोणत्याही अर्थाने पोहचवले तरी माझ्या माणसापर्यंत ते बरोबर पोहचले असल्याने त्यांनी माध्यमांचे आभार मानले. सुटलेला बाण परत येत नाही तसे माणसानेही शब्द फिरवू नये. माझ्या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जातात. त्यात माध्यमांचा दोष नाही, दोष परिस्थितीचा आहे.




मला जेव्हा भूमिका घ्यावयाची असेल तेव्हा सर्वासमोर भूमिका घेईन. कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून ती चालवणारे खांदे अजूनतरी मिळाले नाहीत. आणि माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून एखाद्याला विसावण्याचा प्रयत्नही मी करू देणार नाही, असा इशाराही दिला.
मुंडे-खडसे बंद दाराआड चर्चा
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शनिवारी सकाळी आमदार धनंजय मुंडे यांच्या समवेत गोपीनाथगडावर जाऊन दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन मुंडे कुटुंबीयांची भेट घेतली. या वेळी पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, प्रज्ञा मुंडे यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना खडसे यांनी ही भेट कौटुंबिक होती, यात कुठलीही राजकीय चर्चा नव्हती. आणि भाजपमध्ये पंकजा मुंडे अस्वस्थ आहेत असे जाणवले नाही, असे सांगितले.